नाशकात एकाच दिवसांत ४ हत्या; तिघांवर प्राणघातक हल्ले

रक्तपात सुरूच; शांतताप्रिय नाशकात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रक्तपातामुळे प्रचंड दहशत पसरली असून, अशांतता निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांत नाशकात तब्बल ४ हत्या झाल्याने पोलिसांचा गुन्हेगारीवरील सुटलेला अंकुश पूर्णत: अधोरेखित होत आहे. सोमवारी रात्रीपासून शहरात झालेल्या चार घटनांत चौघांचा बळी गेला असून, एक विवाहिता गंभीर जखमी आहे. तर अन्य तीन हाणामारीच्या घटनांतही तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.

murder
प्रातिनिधिक छायाचित्र

नाशिक । शांतताप्रिय नाशकात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रक्तपातामुळे प्रचंड दहशत पसरली असून, अशांतता निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांत नाशकात तब्बल ४ हत्या झाल्याने पोलिसांचा गुन्हेगारीवरील सुटलेला अंकुश पूर्णत: अधोरेखित होत आहे. सोमवारी रात्रीपासून शहरात झालेल्या चार घटनांत चौघांचा बळी गेला असून, एक विवाहिता गंभीर जखमी आहे. तर अन्य तीन हाणामारीच्या घटनांतही तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.

अंबड औद्योगिक वसाहतीत उद्योजकाचा भरदिवसा खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. यात नंदकुमार आहेर (वय ५०) यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण औद्योगिक वसाहत परिसरासह नाशकात दहशत पसरली.

nandkumar aher
nandkumar aher

सोमवारी रात्री आडगाव शिवारात तरुणावर सशस्त्र हल्ला झाला. यात मारहाण करत टोळके पाठीमागे लागल्याने रस्त्यावरुन पळत असताना कॅनॉलमध्ये पडल्याने युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, विलास लक्ष्मण पवार (वय ३६, रा. बिडीकामगार नगर, अमृतधाम, पंचवटी) असे या मृत युवकाचे नाव आहे.

याशिवाय नांदूर नाका परिसरात माहेरहून एक लाख रुपये आणत नसल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेचा प्रचंड शारीरिक व मानसिक छळ केल्याचे समोर आले. मंगळवारी (दि.७) सकाळी ९ वाजता तिचा अवस्थेत मृतदेह आढळून आला. शिवाय, तिच्या पायाच्या अंगठ्याला, शरीराला मोठी दुखापत झाल्याचे दिसून आले आहे. सोनाली अभिषेक देवकर (वय २२, रा. नांदूरनाका, आडगाव शिवार) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

आणखीन एका घटनेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणार्‍या पतीने कटरच्या सहाय्याने पत्नीचा गळा चिरून तिच्या खून करण्याचा प्रयत्न केला. यात पत्नी क्षणार्धात जमिनीवर कोसळल्याचे पाहून घाबरलेल्या पतीने इमारतीच्या तिसर्‍या मजल्याहून उडी घेतली, यात त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 7) सायंकाळी म्हसरुळ शिवारातील रामकृष्ण नगर येथे घडली. राजीव रतनसिंग ठाकूर (वय 50) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या घटनेतील विवाहितेची गळ्याची नस कापली गेल्याने प्रकृती गंभीर आहे.

दरम्यान, नाशकात झालेल्या अन्य हाणामार्‍यांच्या घटनांमध्ये पंचवटी पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या वज्रेश्वरी नगरात मागील भांडणाच्या कुरापतीतून एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात कुणाल उर्फ दादू विजय थोरात (वय २५, रा. एरंडवाडी) या तरुणाला टोळक्याने लाकडी दंडुक्याने गंभीररित्या मारहाण केली आहे. अन्य एका घटनेत नाशिकरोड भागात दारु पिण्यास पैसे दिले नाही म्हणून एकाच्या डोक्यात कुर्‍हाडीने घाव घातला असून, पंचवटीत क्रिकेट खेळणार्‍या युवकावर सशस्त्र हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटनाही ताजीच आहे. या घटनांनी शहर हादरले असून, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.