गंगापूर धरणात ४५ टक्के साठा; पाणी कपातीचे संकट टळले

नाशिक : तीन दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणात 45 टक्के साठा झाला आहे. परिणामी शहरावर घोंघावत असलेले पाणी कपातीचे संकट तूर्तास टळणार असल्याचे दिसते. यासंदर्भातील निर्णयासाठी पालिका आयुक्त रमेश पवार यांनी सोमवारी (दि.11) अधिकार्‍यांची बैठक बोलवली आहे.

नाशिक शहराला गंगापूर धरणातून पाणी पुरवले जाते. या धरण क्षेत्राच्या परिसरात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस होत असल्यामुळे धरणातील जलसाठा 45 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. रविवारी रात्री पाऊस सुरुच असल्याने या साठ्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 10 टक्के अधिक साठा उपलब्ध आहे. चार दिवसांपूर्वी गंगापूर धरणात अवघे 25 टक्के साठा उपलब्ध होता. त्यामुळे महापालिका पाणी कपातीचा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत होती. यासाठी सोमवारी आयुक्तांनी बैठकही बोलवली होती. परंतु, संततधार पावसामुळे हे संकट टळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. दरम्यान, ठेंगोडा (ता.सटाणा) येथील बंधार्‍यातून 4528 क्यूसेक इतका विसर्ग गिरणा नदीत सोडण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण असेच कायम राहिल्यास यात वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

रविवारी दिवसभरात गंगापूर धरण परिसरात 28 मिलीमीटर तर, कश्यपी धरणात 26 मिलीमीटर, गौतमीमध्ये 36 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर त्र्यंबकेश्वरमध्ये 15 मिलीमीटर आणि अंबोली धरणात 21 मिलीमीटर पाऊस पडला. संततधार पावसामुळे बळीराजा सुखावला असून, दुबारपेरणीचे संकट टळले आहे.