पंधराव्या वित्त आयोग प्रशिक्षणाकडे ५० झेडपी सदस्यांची पाठ

जिल्हा परिषदेच्या ७२ पैकी २२ सदस्यांनीच पूर्ण केले प्रशिक्षण

पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी दरवर्षी प्राप्त होत असतो. मात्र, यातून कोणत्या स्वरुपाची कामे करावीत, याविषयी सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित प्रशिक्षणाकडेच जिल्हा परिषद सदस्यांनी पाठ फिरवली. जिल्हा परिषदेच्या ७२ पैकी २२ सदस्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले.

जिल्हा परिषदेला आतापर्यंत पंधराव्या वित्त आयोगाचे चार हप्ते मिळाले आहेत. यापूर्वी दिलेला निधी खर्च झाल्याशिवाय पुढील निधी न देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला असल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाकडून निधी नियोजनाचे काम सुरू असूून सदस्यांना विकास आराखडा तयार करणे, बंधित निधी, अबंधित निधी, कामांची निवड, ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद पातळीवर प्रस्तावित करावयाची कामे याबाबत माहिती मिळावी म्हणून ग्रामपंचायत विभागाने ५ व ६ ऑक्टोबरला अनुक्रमे पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. त्यात पंचायत समिती सदस्यांनी या प्रशिक्षण वर्गांना चांगला प्रतिसाद दिला. मात्र, दुसर्‍या दिवसाच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रशिक्षणास अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, सभापती अश्विनी आहेर, संजय बनकर यांच्यासह यशवंत ढिकले, नयना गावित, गितांजली पवार-गोळे, शकुंतला डगळे, कलावती चव्हाण, अनिता बोडके, छाया गोतरणे, अशोक टोंगारे, साधना गवळी, लता बच्छाव, नुतन आहेर, कविता धाकराव, शोभा कडाळे, संगिता निकम, जगन्नाथ हिरे, सविता पवार, महेंद्र काले, सुरेश कमानकर हे २२ सदस्य उपस्थित होते. त्यातील अनेक सदस्यांनी केवल सही करण्यापुरती उपस्थिती नोंदवली. त्यामुळे प्रत्यक्ष प्रशिक्षणास १५ सदस्य उपस्थित असल्याचे दिसून आले. त्यातही महिला सदस्यांची संख्या अधिक होती. महिला सदस्यांनी प्रशिक्षणाबाबत उत्सुकता दाखवून पंधरा वित्त आयोगाच्या निधी नियोजनाबाबतच्या तरतदुी समजून घेतल्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्यासह इतर अधिकार्‍यांनी सदस्यांना
मार्गदर्शन केले.

निधीसाठी सदस्यांचे शुक्रवारी आंदोलन

जिल्हा परिषदेला पंधराव्या वित्त आयोगाकडून प्राप्त झालेल्या ३२ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीतून बहुतांश सदस्यांकडून ३६ लाख रुपयांच्या कामांची पत्रे घेण्यात आली आहेत. उर्वरित निधीबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे शुक्रवारी (दि.८) मुख्यालयाच्या प्रांगणात या निधीच्या समान वाटपासाठी धरणे आंदोलन करण्याची भूमिका सदस्या नयना गावित, सिमंतिनी कोकाटे व गितांजली पवार-गोळे यांनी घेतली आहे.सदस्यांंनी पत्र दिल्यानंतर उरलेल्या जवळपास सात कोटींच्या निधीचे काय करणार, या प्रश्नाला नंतर पत्र मागवले जातील, असे उत्तर देण्यात आले. एकीकडे अधिकार्‍यांनी दोन दिवसांमध्ये सर्व कामे अंतिम करण्यात येणार असल्याची माहिती दिली असतानाच सदस्यांकडून नंतर पत्र मागवले जातील, असे उत्तर मिळालेे. माहितीमधील विसंगतीमुळे महिला सदस्यांनी प्रशिक्षणानंतर पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचे समान वाटपासाठी आक्रमक भूमिका घेतली. यासाठी अध्यक्ष व प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे सांगितले. सर्व सदस्यांना धरणे आंदोलनाची माहिती दिली जाणार आहे.