घरमहाराष्ट्रनाशिकयंदाच्या लग्नसराईचे ५८ मुहूर्त; मे महिन्यात सर्वाधिक १४

यंदाच्या लग्नसराईचे ५८ मुहूर्त; मे महिन्यात सर्वाधिक १४

Subscribe

प्रमोद उगले । नाशिक

यंदा ५ नोव्हेंबरला तुळशी विवाह झाल्यानंतर विवाह सोहळ्यांना सुरुवात होणर आहे. यंदा बर्र्‍यापैकी मुहूर्त असल्याने लग्न जमवतानाच वधू-वरांचे पालक आतापासून मंगल कार्यालय, केटरर्सचे बुकिंग करायला प्राधान्य देत आहेत. पंचांग शास्त्राप्रमाणे यंदा 25 नोव्हेंबर ते पुढील वर्षी 28 जूनपर्यंत विवाहासाठी 58 मुहूर्त आहेत. त्यातही सर्वाधिक 14 मुहूर्त हे मे महिन्यात असून, गुरूच्या अस्तामुळे एप्रिलमध्ये केवळ एकच मुहूर्त आहे.

- Advertisement -

कोरोना संकटकाळामुळे नियमांच्या बंधनात अडकलेल्यांना आता निर्बंधमुक्त समारंभ साजरे करण्यास मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे यंदा लग्नसराई धुमधडाक्यात होईल, अशी चिन्हे आहेत. विशेष म्हणजे या निर्बंधमुक्त वातावरणात लग्नसराईवर अवलंबून असलेल्या लहान-मोठ्या व्यावसायिकांचा आर्थिक गाडा पुन्हा एकदा रूळावर येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वधू-वर पक्षांकडून मंडप, बिछायत, मंगल कार्यालये, वाजंत्री, केटरर्स, सजावट, फुलवाले, घोडेवाले, बेन्जो यांची बुकिंग करायला सुरुवात झाली आहे. या लहान-मोठ्या व्यावसायिकांना ऑर्डर मिळू लागल्याने त्यांच्यामधूनही समाधान व्यक्त केले जाते आहे.

कोरोनाकाळात झालेले बुकिंग रद्द करण्याची नामुष्की त्यांच्यावर आल्याने त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. मात्र, यंदा सर्व निर्बंध हटल्यामुळे लग्न समारंभ धुमधडाक्यात साजरे होणार आहेत. यावेळी गुरूचा अस्त असल्यामुळे एप्रिलमध्ये केवळ एकच दिवस (30 एप्रिल) मुहूर्त आहे. तर, जूनमध्ये 12 आणि फेब्रुवारी महिन्यात 10 मुहूर्त राहणार आहेत. 2023 मध्ये 29 जूनपासून चातुर्मास सुरू होत आहे.

- Advertisement -
मंगल कार्यालयांसह बँड पथकांची सुपारी महागली

दोन वर्षानंतर यंदा लग्नसराई धुमधडाक्यात साजरी होणार असली तरी त्यांचा फटका वधू-वर पक्षाच्या खिशाला बसणार आहे. मंगल कार्यालय, बॅन्ड पथकांनी त्यांच्या सुपारीत २० ते ३० टक्क्यांनी वाढ केली आहे. त्याचबरोबर किराणा मालात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे पंगतीचा खर्चही वाढणार आहे. एकंदरीत यंदा वधू-वर पक्षाच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार असल्याचे दिसून येत आहे.

दोन वर्षांपासून कर्ज काढून लाखो रुपये खर्च करून तयार केलेली बॅन्डची वाहने घरीच उभी असल्याने कर्जाचे हप्ते थकले होते. यंदा कोरोनाचे निर्बंध हटल्याने चांगल्या बूकिंग झाल्या आहेत. : शशिकांत कचवे, बॅन्ड मालक

किराणामालाच्या किंमतीत वाढ झाल्याने आम्हाला नाईलाजास्तव लॉन्सच्या पॅकेजमध्ये ३० टक्यांनी वाढ करावी लागली आहे. भाववाढ झाली असली तरीही मोठ्या प्रमाणावर तारखा बूक झाल्या आहेत. : लहानू गुंजाळ, मंगल कार्यालय मालक

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -