सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नाशिक, अहमदनगरच्या उपकेंद्रांसाठी ६ कोटी

पुणे विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात तरतूद

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक व अहमदनगर येथील उपकेंद्रांच्या इमारतींसाठी एकूण सहा कोटी रुपयांची तरतूद विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. नाशिकच्या इमारत बांधकामासाठी दोन कोटी रुपये देण्यात येणार असून, त्याची निविदाही प्रसिध्द झाली आहे. पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रासाठी शिवनई येथील ६२  एकर जागा आरक्षित असताना मंजूरीसाठी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली.

अखेर विद्यापीठाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात नाशिकसह अहमदनगरच्या उपकेंद्रासाठी ६  कोटी रुपयांच्या तरतूद करण्यात आली आहे. यातील दोन कोटी रुपये हे नाशिकच्या उपकेंद्रासाठी दिले जातील. त्याची निविदाही विद्यापीठाने प्रसिध्द केल्यामुळे आता उपकेंद्राचा प्रश्न निकाली निघाला असून, उर्वरित रक्कम ही व्यावसायिक अभ्यासक्रमांना आवश्यक मुलभूत सुविधांसाठी वापरात येणार आहे. सीनेट सदस्य अमीत पाटील यांनी यासाठी पाठपुरावा करणार्‍या सर्वांचे आभार मानले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पर्यावरण मंत्री यांच्या आदेशानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उपकेंद्राचा विषय मार्गी लावला. विद्यापीठाने अर्थसंकल्पात विशेष तरतूद केल्यामुळे नाशिकचे उपकेंद्र सुरु होईल. त्यासाठी कुलगुरु, युवासेनेसह सर्वांचे आभार मानतोे.
– अमीत पाटील, सीनेट सदस्य, पुणे विद्यापीठ