चार वेगवेगळ्या अपघातांत ६ ठार; सहा गंभीर

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाटात प्रवासी वाहतूक करणार्‍या जीपच्या अपघातात एक महिला, तर सिन्नरनजिक नायगावरोडवर मापारवाडी येथे झालेल्या अपघातात दोघे ठार झाल्याची घटना घडली. मोहदरी घाटातील घटनेत पाच प्रवासी जखमी झाल्याचे समजते. मंगळवारी (दि.२३) सकाळी हे अपघात झालेत. याशिवाय पैठणमध्ये आधारकार्ड काढायला निघालेल्या बाप-लेकीचा अपघाती मृत्यू झाल्याची, तर एक मुलगी गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. तर पिंपळगावी दुचाकीच्या धडकेत एका पादचार्‍याचा मृत्यू झाला.

सिन्नरनजिक तिघांचा मृत्यू; पाच प्रवासी जखमी

सिन्नरनजिकच्या अपघाताबाबत अधिक वृत्त असे की, नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाट परिसराती सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनाचा अपघात झाला, यात १ महिला ठार, ५ जण गंभीर जखमी झाले. विनाक्रमांकाची ही जीप खासगी प्रवासी वाहतूक करत नाशिकहून सिन्नरकडे निघाली होती. मोहदरी घाट चढताना पहिल्याच वळणावर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना या जीपने पुढे जाणार्‍या अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिली. यामुळे जीपच्या पुढील बाजूचा चेंदामेंदा झाला. यात शारदा मोरे (वय ४५, रा. उद्योग भवन, सिन्नर, जि. नाशिक) या महिलेच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर संतोष गडाख (वय ४४), मनीषा मुकेश सावंत (वय ४०), ललिता प्रभाकर जाधव (वय ५०), पुष्पा प्रदीप खंडारे (वय ४७, रा. सर्व नाशिकरोड) आणि शोभा कैलास शिंदे (वय ४५, रा. देवळाली गाव) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अन्य वाहनचालकांनी महामार्ग पोलीस तसेच सिन्नर एमआयडीसी पोलिसांना अपघाताबाबत कळवले. यानंतर रुग्णवाहिकाचालक गणेश काकड, गणेश गायकवाड, अजित सहाणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना स्थानिकांच्या मदतीने सिन्नरमधील खासगी रुग्णालयात पोहोचवले.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले. यावेळी महामार्ग पोलीस उपनिरीक्षक वाय. एस. शिंदे, आर. एस. तडवी यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. तसेच अपघातानंतर झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली.
अन्य एका घटनेत मंगळवारी सकाळीच पल्सर दुचाकी (क्र. एमएच १५ एचएल ३२९८)ने दोन तरुण माळेगाव एमआयडीसीतून नायगाव रस्त्याने सिन्नरकडे येत असताना मापारवाडी शिवारात मातोश्री इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या बसने (क्र. एमएच १५ एके १४४३) ने त्यांना जोरदार धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरून रस्त्यावर पडल्याने ज्ञानेश्वर राजेंद्र भारस्कर (वय २४, रा. कोनांबे) व अनिकेत नंदू खताळे (वय २२, करोळे, ता. इगतपुरी, हल्ली मु. सिन्नर, जि. नाशिक) या दोघांचा डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिकांनी सिन्नर पोलीस व रुग्णवाहिकेला याबाबत माहिती दिली. स्थानिकांनीच दोघांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक रामदास धुमाळ करत आहेत.

पैठण : दुचाकीस्वार बापलेकीचा मृत्यू

  आखातवाडा रोडवर झालेल्या भीषण अपघातात खेरडा येथील बाप-लेकीचा मृत्यू झाल्याची, तर अन्य एका मुलीला गंभीर दुखापत झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पैठण येथे आधारकार्ड नोंदणीसाठी आलेल्या गायत्री सतीश शिंदे व सतीश शिंदे असे अपघातात मृत्यू झालेल्या बाप-लेकीचे नाव आहे. यातील गायत्री शिंदे ही तिसर्‍या वर्गात शिकत होती. तिचे जखमी वडील सतीश शिंदे यांचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. तर कोमल सतीश शिंदे ही सहावी वर्गात शिकत असलेली मोठी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
खेरडा येथील रहिवासी सतीश शिंदे हे आपल्या गायत्री व कोमल या दोन्ही मुलींना घेऊन आधारकार्ड नोंदणीसाठी पैठणला आले होते. गावी परत जात असताना दुपारच्या सुमारास आखातवाडा गावाच्या अलीकडे उभ्या आयशर वाहनावर त्यांची दुचाकी धडकून भीषण अपघात झाला. या घटनेने खेरडा गावासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पैठणचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुधीर वावळ व विजय मोरे हे अपघातप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

दुचाकीच्या धडकेत अज्ञात पादचार्‍याचा मृत्यू

 मुंबई-आग्रा महामार्गावर पंचगंगा लॉन्ससमोर शिरवाडे-वणी शिवारात चांदवड बाजूकडून नाशिककडे जाणार्‍या महामार्गावर पायी जाणार्‍या अज्ञात व्यक्तीला एका दुचाकीने धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याची ओळख अद्यापही पटली नसून दुचाकीचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बजाज प्लॅटिना दुचाकी (क्रमांक एमएच १५ सीवाय 6098) ही चांदवड बाजूकडून नाशिककडे भरधाव वेगाने जात असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अविचाराने चालवणार्‍या चालकाने एका पादचारी अज्ञात व्यक्तीस (अंदाजे वय ४०) याला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात पादचारी व्यक्तीच्या डोक्यास तसेच हाता-पायास गंभीर दुखापत झाली. या व्यक्तीचे उपचारादरम्यान निधन झाले. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात दुचाकीचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताची अद्याप ओळख पटली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.