गावठी कट्टे बाळगणार्‍या टोळीच्या आवळल्या मुसक्या

3 कट्टे, एअरगन, चॉपरसह ६ जिवंत काडतुसे जप्त; नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई

बेकायदा शस्त्र बाळगार्‍यास टोळीच्या नाशिक ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांनी बुधवारी (दि.२६) बोरगाव ते सुरगाणा रस्त्यावर चिराई त्रिफुली येथे नागशिवडीगाव शिवारात तिघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून तीन गावठी कट्टे, एअरगन, चॉपरसह सहा जिवंत काडतुसे जप्त केले आहेत.

अंकेश सुरेश एखंडे (वय २९, रा. गोडंब, सुरगाणा), श्यामराव नामदेव पवार (वय २४, रा. वांजूरपाडा, सुरगाणा), आकाश सुनील भगरे (वय २२, रा. सुरगाणा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकासह बुधवारी (दि.२६) बोरगाव ते सुरगाणा रस्त्यावर चिराई त्रिफुली येथे नागशिवडीगाव शिवारात छापा टाकला. बेकायदा शस्त्र बाळगणार्‍यांना पथकाने ताब्यात घेतले. याप्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.