घरमहाराष्ट्रनाशिकसमाजकंटकांनी तोडले धनोली धरणाचे गेट; लाखो लिटर पाणी वाया

समाजकंटकांनी तोडले धनोली धरणाचे गेट; लाखो लिटर पाणी वाया

Subscribe

शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान, चार जणांना पोलिसांनी केली अटक

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली असताना कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील धनोली धरणाचे गेट शनिवारी सायंकाळच्या सुमारास काही समाजकंटकांनी तोडल्याची घटना घडली. या प्रकारामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडून पाण्याबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांच्या पीकांचेही मोठे नुकसान झाले आहे. धरणातून सुमारे ७ ते ८ दशलक्ष घनफूट पाणी वाया गेल्याचे सांगितले जाते आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

कळवण तालुक्यात धनोली हे धरण असुन, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास काही समाजकंटकांनी धनोली धरणाचे लोखंडी गेट तोडल्यानंतर धरणातून पाण्याचा प्रचंड प्रवाह बाहेर पडल्याने धरणाच्या बाजूला शेतात काम करत असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी गेटच्या बाजूने धावत जाऊन गेट तोडणाऱ्या चारही व्यक्तींना पकडले. गावातील ग्रामस्थांनी त्यांना धनोली गावातील मंदिरात कोंडून ठेवले. गेट तोडणारे चारही जण हे कळवण तालुक्यातीलच दळवट येथील रहिवाशी असल्याचे समजल्यानंतर धनोली गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. तहसीलदार बंडू कापसे, पोलीस उपाधीक्षक सदाशिव वाघमारे, अभोणा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक उमाकांत गायकवाड व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजित रौंदळ यांच्यासह प्रशासकीय यंत्रणेने धनोली गावात रात्री नऊ वाजेच्या सुमारास धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, गेट तोडणारे प्रमोद बयाजी पवार (६०), सोनू बंडू गावित(६०), शंकर केवजी चव्हाण (५५), सुभाष येवाजी पवार (६०) (सर्व रा. दळवट) यांना अभोणा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

धरणाचे पाणी शेतात घुसल्याने आदिवासी शेतकरी हरिशचंद्र गायकवाड, भास्कर दळवी, अंबादास गायकवाड, सुखराम पवार, किसन वाघ यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे तीनशे क्विंटल कांदा वाहून गेला आहे. शेतात साठविलेला जवळपास दीडशे क्विंटल कांदा भिजला असुन मिरची, कोथिंबीर, उन्हाळी बाजरी व वालपापडी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन अंदाजे १२ ते १३ लाखांचे नुकसान झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -