शहरात ७ हजार विनापरवानाधारक रिक्षाचालक

परवाना न घेताच रिक्षा चालवणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, शहरात सुमारे ७ हजार विनापरवाना रिक्षाचालक आहेत. रिक्षाचालकांमध्ये अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, त्यांच्याकडून प्रवाशांना मारहाण करत लूटमार केली जात आहे. परिणामी, प्रवाशांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण होत आहे.

नाशिक शहरात २० हजार २०० परवानाधारक रिक्षाचालक आहेत. ते रिक्षाचालकास रिक्षा भाड्याने देत आहेत. त्यानंतर रिक्षाचालक शहरात मनमानी पद्धतीने रिक्षा चालवतात. अनेक रिक्षाचालक सिग्नल न पाळणे, प्रवाशांकडून जादा प्रवासी भाडे आकरत आहेत. तसेच,रिक्षाचालकांकडून महिलांची छेडछाड, वाहतुकीची कोंडी होईल अशा पद्धतीने रिक्षा पार्क करणे यांसारखे प्रकार वाढले आहेत. असे रिक्षाचालक नाशिक शहराची वाट लावत असल्याचे विदारक चित्र आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे रिक्षाचालक पोलिसांनासुद्धा जुमानत नाहीत. शिवाय, पोलिसही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे त्या रिक्षाचालकांचा मुजोरपणा वाढत आहे. नाशिक शहर पोलिसांनी हेल्मेटसक्ती करताना बेशिस्त व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशी करु लागले आहेत.

परवानाधारक रिक्षामालकांनी आपली रिक्षा दुसर्‍या व्यक्ती भाड्याने देवू नये. भाडेतत्वावर रिक्षा घेणार्‍या रिक्षाचालकांमध्ये काहीजण गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्यामुळे रिक्षाचालकांची बदनमी होत आहे. शहरात सुमारे ७ हजार परवाना नसलेले रिक्षाचालक आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या चालकांवर कारवाई झाली पाहिजे,
– शिवाजी भोर, सरचिटणीस, महाराष्ट्र शिववाहतूक सेना