नाशिक जिल्ह्यातील ७६ पेट्रोलपंप ड्राय; पुरवठा पूर्ववत होण्यास लागणार ८ दिवस

नाशिक : जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून सुमारे ८४ टक्के पेट्रोल पंपावरील पुरवठा सुरळीत सुरू असल्याचा दावा पेट्रोल कंपन्यांकडून केला जात आहे. कंपन्यांनी क्रेडीट पॉलिसी सुरू केल्याने अ‍ॅडव्हान्स पेमेंटवरच माल देण्यास सुरूवात केली. मात्र, अनेक पेट्रोल पंप चालकांनी अ‍ॅडव्हान्स पेमेंट करूनही इंधन पुरवठा केला जात नसल्याचे पेट्रोल डिलर्सच्यावतीने सांगण्यात आले. सद्यस्थितीत जिल्हयातील ७६ पेट्रोल पंप ड्राय आहेत. मात्र, पुरवठा साखळी सुरू होण्यास आणखी आठ दिवस लागतील, असा अंदाज ऑईल कंपन्यांकडून वर्तविला
जात आहे.

जिल्ह्यात सध्या डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून, ऑईल कंपन्यांकडून पुरवठा केला जात नसल्याची पंप चालकांची तक्रार आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांच्या कार्यालयात ऑईल कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. जिल्ह्यात ४६५ पेट्रोल पंप असून यामध्ये ४० टक्के पंप हे भारत पेट्रोलियम कंपनीचे आहेत. यापैकी इंडियन ऑईल आणि हिंदुस्थान पेट्रोलियमचे पंप सुरू आहेत. भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने गेल्या पंधरा दिवसांपासून क्रेडीट पॉलीस सुरू केली आहे. त्यामुळे या कंपन्यांनी अ‍ॅडव्हान्स पेमेंटवरच माल द्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे ज्यांनी पेमेंट केले त्यां डिलर्सला इंधन पुरवठा करण्यात येत आहे. काही पेट्रोल पंप चालकांकडून पेमेंट होत नसल्याने पुरवठा केला जात नसल्याचे या बैठकीत सांगण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे, भारत पेट्रोलियम कंपनीकडूनच पुरवठा होत नसल्याचे दिसून येते. सध्या जिल्हयात ४६५ पैकी ३८९ पेट्रोल पंप सुरू असून ७६ पेट्रोल पंप बंद आहेत. यात जिल्ह्यात भारत पेट्रोलियमचे सर्वाधिक ५५ पंप ड्राय झाले आहेत. पुढील ८ दिवसांत पुरवठा सुरळीत सुरू होईल, असे कंपनीकडून या बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीला इंडियन ऑईलचे एस. राजमिनाक्षी, संदीप पाटील, हिंदुस्थान पेट्रोलियमचे कौशिक भौमिक, भारत पेट्रोलियमचे स्वप्निल पटेल उपस्थित होते.

पेट्रोल पंपचालकांनी ३१ मे रोजी केलेल्या आंदोलनादरम्यान पंप चालकांना बदनाम करण्याच्या हेतूनेच ऑईल कंपन्यांकडून इंधनाचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. पंधरा दिवसांपूर्वी तीनपैकी दोन ऑईल कंपन्यांनी अचानक क्रेडीट पॉलीसी बंद करून अ‍ॅडव्हान्स पेमेंटवरच माल द्यायला सुरूवात केली. भारत पेट्रोलियमने कोणतेही कारण न देता मालाचे रेशनिंग सुरू केले. पेट्रोलियम मंत्रालय या विषयी काहीच सांगत नाही. एखादी कंपनी अचानक आपले धोरण बदलते, हे योग्य कि अयोग्य आहे’ : उदय लोध, अध्यक्ष फामपेडा

पेट्रोल पंपचालक पेमेंट करत नसल्याची तक्रार चुकीची आहे. ३० मे रोजी जिल्ह्यातील ३० ते ४० पंपचालकांनी कंपनीला अ‍ॅडव्हान्स पेमेंट करूनही कंपन्यांकडून इंधन पुरवठा केला जात नाही. या सर्व पंप चालकांची यादी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना देण्यात आली आहे. यावर ऑईल कंपन्यांकडून कोणताही खुलासा करण्यात येत नाही. उलट पंपचालकांनाच दोषी ठरविण्यात येत आहे. इंडियन ऑईल आणि हिंदुस्थान पेट्रोलियमचा पुरवठा सुरळीत सुरू असला तरी भारत पेट्रोलियमकडून डिझेल पुरवठा होत नसल्याने भार इतर पंपावर येत आहे” : भूषण भोसले, अध्यक्ष, पेट्रोल डिलर्स असोसिएशन