घरताज्या घडामोडीजादा परताव्याच्या आमिषाने ८० लाखांची फसवणूक; गुंतवणूकदाराची पोलिसांकडे धाव

जादा परताव्याच्या आमिषाने ८० लाखांची फसवणूक; गुंतवणूकदाराची पोलिसांकडे धाव

Subscribe

खोटी माहिती देत दोन जणांनी कंपनीच्या नावे गुंतवणूकदारांकडून जादा परताव्याच्या आमिषाने ८० लाख ५० हजार रुपये घेतले. करारनाम्याप्रमाणे परतावा न देता त्यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली. फसवणुकीची व्याप्ती मोठी असून, याप्रकरणी गुंतवणूकदार कर्नल आशुतोष पंढरीनाथ आढाव (४९, रा. आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड) यांनी उपनगर पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी एमपीआयडी कायद्याअन्वये गुन्हा दाखल केला आहे. अरविंद ग्यानशंकर सिंग (४२, रा.कृष्णवंदन रो-हाऊस, आर्टिलरी सेंटर रोड), राजेशकुमार विजयकुमार सिंग (३८, रा. साईश्रध्दा अपार्टमेंट, जेलरोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांनी संगनमत करत फ्युचर ट्रेडींग सोल्युशन कंपनीबाबत आशुतोष पंढरीनाथ आढाव यांच्यासह गुंतवणूकदारांना खोटी माहिती देत लाखो रुपयांच्या रकमा स्विकारल्या. त्या बदल्यात मेमोरंडम ऑफ अंडरस्टॅडींग व सिक्युरिटी धनादेश देवून करारनाम्याप्रमाणे परतावा दिला नाही. फ्युचर ट्रेडींग सोल्युशन फर्ममध्ये गुंतवणूक केलेली असताना दोघांनी गुंतवणुुकदारांना फ्युचर फॉर्च्युन या नवीन फर्मचा धनादेश देत ८० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. फसवणूक गुन्ह्याचा तपास उपनगर पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक केदार करत आहेत. नाशिक शहरातील गुंतवणूकदारांनी या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असल्यास तत्काळ आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक केदार यांनी केले आहे.

गुंतवणुकदारांसाठी पोलिसांचे आवाहन

श्री माउली मल्टीस्टेट क्रेडीट कोऑप सोसायटी प्रा.लि. व संकल्पसिद्धी प्रॉडक्ट प्रा.लि.कंपनीचे संचालक विष्णू रामचंद्र भागवत व इतर संचालकांविरुद्ध मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. कमी कालावधीत जादा परताव्याचे आमिष दाखवून भुलथापा देणार्‍या व विविध सराफ व्यवसायिकांकडून चालविण्यात येणार्‍या मासिक बचत योजनांच्या परताव्याच्या आमिषांना बळी पडू नये. गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित संस्था अथवा कंपनी शासकीय नियमाप्रमाणे काम करतात की नाही, त्यांना संबंधित विभागाची परवानगी आहे की नाही, याची खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -