घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रघोटीच्या व्यापार्‍याला निर्यातीच्या नावाखाली ८० लाखांना गंडा

घोटीच्या व्यापार्‍याला निर्यातीच्या नावाखाली ८० लाखांना गंडा

Subscribe

नाशिक : परदेशात भाव वाढले असल्यामुळे तांदूळ, मैदा आदी साहित्य निर्यात केल्यास मोठा नफा होईल, असे आमिष दाखवून बोरीवली, मुंबई येथील दोघांनी इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील योगेश्वर राईस मिलचे संचालक माधव लक्ष्मण काळे (वय ६३) यांची तब्बल ८० लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी माधव लक्ष्मण काळे (रा. घोटी) यांनी घोटी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार बोरिवली येथील जयेश भरत बर्मन व भरत बर्मन (रा. अनुराधा अपार्टमेंट, सहकार निकेतन हाऊसिंग सोसायटी, गोविंदनगर, बोरिवली पश्चिम, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व माधव काळे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित जयेश बर्मन व भरत बर्मन यांनी वेळोवेळी काळे यांना दक्षिण आफ्रिकेत व परदेशात तांदळाचे भाव वाढले आहेत. काळे यांनी निर्यात केली तर त्यांना चांगली किंमत मिळू शकेल. तुमचा तांदूळ निर्यात करण्यासाठी आम्ही मदत करू असे सांगून काळे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर निर्यातीचा परवाना काढण्यासाठी 12 ते 15 लाख रुपये लागतात. तो आम्ही 10 लाखांत मिळवून देतो, असे सांगून जयेश बर्मन यांनी काळे यांना संत तुकाराम साखर कारखाना येथे नेऊन 3 लाख 11 हजार रुपये डीडीद्वारे भरून घेतले. यापाठोपाठ आफ्रिकेमध्ये आटा व मैदा यांचेही भाव वाढले आहेत, अशी बतावणी आरोपींनी केल्यामुळे काळे यांनी नाशिकरोडच्या मोठ्या व्यापार्‍यांकडून 4 लाख 23 हजार 750 रुपये किंमतीचा आटा व मैदा खरेदी केला.

- Advertisement -

मात्र, यानंतर आरोपींनी या मैद्याची निर्यात केलीच नाही. त्यामुळे या किंमतीचा भुर्दंड काळे यांना सहन करावा लागला. तसेच तांदूळ निर्यातीसाठी काळे यांनी आरोपींना 25 किलो वजनाची एक बॅग असा 119 टन वजनाचा 38 लाख 37 हजार 497 रुपये किंमतीचा तांदूळ पॅकिंग करून न्हावाशेवा बंदरात पाठवून दिला. या तांदळाचा वाहतूक खर्च म्हणून 7 लाख 50 हजार रुपये घेतले पण हा तांदूळ त्यांनी आपण स्वत:च घोटीच्या योगेश्वर राईसचे मालक व संचालक आहोत, असे भासवून काळे यांचा तांदूळ स्वत:च्या नावाने निर्यात करून आलेल्या रकमेचा अपहार केला. यासह विविध कारणांनी वेळोवेळी रोख व इतर माध्यमांतून आरोपींनी काळे यांची एकूण 79 लाख 22 हजार 247 रुपयांची फसवणूक केली आहे. घोटी पोलिसांनी याप्रकरणी संशयित आरोपी भरत बर्मन व जयेश बर्मन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -