घरक्राइमशहरातील गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान; फुलेनगरमध्ये टोळक्याचा दहशत पसरवत गोळीबार

शहरातील गुन्हेगारी रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान; फुलेनगरमध्ये टोळक्याचा दहशत पसरवत गोळीबार

Subscribe

नाशिक : शहरात दहशतीसाठी गुन्हेगारांकडून गोळीबारांसह कोयत्याने जीवघेणे हल्ले केले आहेत. वाढत्या हल्ल्यांच्या घटनांमुळे धार्मिकनगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकची ओळख आता गुन्हेगारी शहर म्हणून होवू लागली आहे. फुलेनगर येथील मुंजोबा चौकात जुन्या वादाच्या कुरापतीवरून एका युवकावर हल्ला करत घरावर गोळीबार केल्याची घटना शनिवार (दि.११) रोजी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान घडली. या गोळीबारात एक महिला जखमी झाली असून, एका श्वानास गोळी लागली आहे.

पंचवटीतील फुलेनगर परिसरात जुन्या वादातून टोळक्याने थेट एका घरात घुसून महिलेवर आणि तिच्या मुलावर कोयत्याने संशयित आरोपी विशाल भालेराव, विकी वाघ, संदीप अहिरे, जय खरात यांच्यासह काही हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यानंतर एकाने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारमध्ये महिलेच्या अंगाला गोळी लागल्याने ती जखमी झाली आहे. उषा महाले असे या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. ही संपूर्ण फायरिंगची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे.

- Advertisement -

शनिवारी (दि.११) रात्री आठ वाजेच्या सुमारास फुलेनगर परिसरत मुंजोबा चौकात दयानंद महाले यांचा मुलगा प्रेम महाले आणि त्याचा मित्र युवराज भोळके हा चौकात बसलेला होता. जुन्या भांडणाच्या कुरापतीवरून येथे ७ ते ८ जणांच्या टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यावेळी त्याने वार हुकून घराकडे पळ काढला असता हल्लेखोरांनी थेट महाले यांच्या घरावर हल्ला करत गोळीबार केला. याप्रकरणी जाब विचारण्यासाठी आलेल्या उषा महाले यांच्या दिशेने देखील हल्लेखोरांनी बंदुकीतून फायरिंग केली. त्यावेळी आरोपींच्या हातात कोयते होते. तर एक जण गोळीबार करत होता. सुदैवाने उषा महाले यांच्या छाती जवळून गोळी गेल्याने त्या बचावल्या.

फायर केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांकडून ही माहिती देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. गत आठवड्यात होळीच्या दिवशी भररस्त्यात सराईत गुन्हेगार किरण गुंजाळ याची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा फुलेनगर भागात ही गोळीबारची घटना समोर आली आहे. अशा घटनांनी नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. गोळीबाराच्या घटनेस दोन दिवस उलटले तरी एकही संशयित आरोपी पोलिसांना सापडलेला नाही. काही संशयितांवर यापूर्वी पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. तरीही ते उजळमाथ्याने शहरात वावरत असून, पुन्हा गुन्हे करत एक प्रकारे त्यांनी पोलीस यंत्रणेलाच आव्हान देत आहेत.

- Advertisement -
हल्ल्यांच्या घटनांनी बिघडतेय शहरातील सामाजिक स्वास्थ्य

नाशिकमध्ये प्राणघातक हल्ले, मारहाण, खंडणी वसुली, विनयभंग अशा घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे नाशिकची गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांसमोर गुन्हेगारीचा बिमोड करण्याचे आव्हानच उभे ठाकले आहे. रोज गुन्हेगारीच्या घटनांनी नाशिक शहरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत असल्याचे चित्र आहे. खरं तर धार्मिक नगरी, ऐतिहासिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहराचे सामाजिक स्वास्थ सध्या बिघडले असून दिवसाढवळ्या सर्रास प्राणघातक हल्ले, मारहाण करण्याच्या घटना होत आहेत. या सर्व घटनांनी शहरात कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पोलीस आयुक्तांनी यावे अ‍ॅक्शन मोडवर

नाशिक शहरात टोळक्यांकडून चॉपर, तलवार, कोयता, चाकू, गावठी कट्टा याचा सर्रास वापर सुरू असल्याने सामान्य नागरिकांना परिसरात वावर करणे कठीण झाले आहे. यावर तातडीने पोलीस आयुक्तांनी अ‍ॅक्शन मोडवर येत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

अशा आहेत गोळीबारांच्या घटना
  • शिवजयंतीनिमित्त उपनगर पोलीस ठाणेहद्दीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गोळीबार करण्यात आला होता.
  • जुन्या भांडणातून देवळाली कॅम्प परिसरात तरुणांनी फायरिंग केली होती. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
  • फुलनेगरमध्ये दहशत निर्माण करत टोळक्याने कोयत्याने हल्ला करत गोळीबार केला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -