देशातील पर्यावरणतज्ज्ञांची नाशिकमध्ये होणार परिषद

जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांची माहिती

environment

नाशिक : जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनामध्ये सिंहाचा वाटा असलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याला अवैधरित्या उत्खननप्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनासह वनविभागही खडबडून जागा झाला आहे. यानंतर आता ब्रम्हगिरी पर्वताचा परिसर जिल्हा प्रशासनाने इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर केला असला तरी त्याची अधिसूचना अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. हा प्रस्ताव नागपूरच्या वनविभाग कार्यालयाकडे पाठवला आहे.

येत्या एक-दीड महिन्यांत त्यास मंजूरी मिळून ब्रम्हगिरी पर्वत क्षेत्र खर्‍या अर्थाने इको सेन्सिटिव्ह झोन होईल, असा विश्वास जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये व्यक्त केला. त्यानंतर नाशिकमध्ये देशभरातील पर्यावरण तज्ज्ञांची राष्ट्रीय परिषद घेऊ, असेही त्यांनी जाहीर केले.

त्र्यंबकेश्वरजवळील ऐतिहासिक पौराणिक धार्मिक महत्त्व प्राप्त असलेल्या ब्रम्हगिरी पर्वत गोदावरीचे उगमस्थान आहे. याबाबत पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवल्यानंतर ब्रह्मगिरी वाचवा चळवळ सुरू करण्यात आली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणी लक्ष घातले. जिल्हा प्रशासनाने ब्रह्मगिरी पर्वताचा परिसर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर केला आहे. परंतू प्रत्यक्षात हा परिसर इको सेन्सिटिव्ह झोन केव्हा होणार हे जाणून घेण्यासाठी राजेद्र सिंह नाशिक दौर्‍यावर आले आहेत. त्यांनी याबाबत जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेत याविषयी सविस्तर चर्चा केली.

प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या पाठपुराव्याबाबत सिंह यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी आणि अन्य यंत्रणांचे अधिकारीदेखील सकारात्मक असल्याचा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. ब्रह्मगिरी पवर्ताचे जेथे उत्खनन झाले तो भागही जाणीवपूर्वक इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट केल्याची व परिपूर्ण अहवाल मंजुरीसाठी नागपूरला पाठविल्याची माहिती वन विभागाच्या अधिकार्‍यांनी आपल्याला दिल्याचे सिंह यांनी सांगितले.

जिल्हाधिकार्‍यांसह प्रशासकीय यंत्रणा या विषयाबाबत गंभीर असून पुढील एक दिड महिन्यातच ब्रम्हगिरी पर्वताचा परिसर इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर होईल, असा विश्वास सिंह यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला. ब्रह्मगिरी उत्खनन प्रकरणात जिल्हा प्रशासन कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न करीत नसल्याचा दावाही सिंह यांनी यावेळी केला. कुठल्याही परिस्थितीत ब्रम्हगिरीची हिरवाई आणि गोदावरीचा पवित्रता टिकवायला हवी असा आग्रह सिंह यांनी केला.