शेतजमीन विक्रीचे पैसे लुटण्यास आलेल्या चोरट्यांनी केला शेतकर्‍याचा खून

ग्रामीण पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या

शेतजमीन विक्रीचे पैसे लुटण्यासाठी घरात घुसलेल्या चोरट्यांना प्रतिकार करण्याचा शेतकरी दाम्पत्याने प्रयत्न केला. मात्र, एका चोरट्याने धारदार कुर्‍डाडीने घाव घातल्याने शेतकर्‍याचा खून झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी (दि.२३) बागलाण तालुक्यातील कोटबेल येथील गोमदार शिवारात घडली. नाशिक ग्रामीण पोलिसांनी वेगाने तपास आठ संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. शेतकरी सहादू रामचंद्र खैरनार असे खून झालेल्याचे नाव आहे.

पंकज उर्फ सागर बाजीराव चौधरी, (रा.नेर, ता.जा.धुळे), भुर्‍या उर्फ मुश्ताक सय्यद (रा.लळींग, ता.जि.धुळे), अंकुश दादाजी पवार, (रा.रावळगाव, ता.मालेगाव जि.नाशिक), विठ्ठल अर्जून दळवी, (रा. रिटायर्ड वस्ती. जळगाव, ता.मालेगाव जि.नाशिक), काळू ऊर्फ बळीराम उत्तम सोनवणे (रा.बोरमाळ, ता.मालेगाव, जि.नाशिक), अरूण उर्फ आर्‍या संतोष पवार (रा.रावळगाव, ता.मालेगाव जि.नाशिक), वसंत प्रभाकर सोनवणे (रा.रावळगाव ता.मालेगाव जि.नाशिक), सागर कैलास आहिरे (रा.बोरमाळ, ता.मालेगाव जि.नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, गोमदरा शिवारात शेतकरी सहादू रामचंद्र खैरनार पत्नीसह राहतात. त्यांनी काही दिवसांपूर्वीच शेतजमिनीची विक्री केल्याची माहिती चोरट्यांना मिळाली. संशयित आरोपींनी शेतजमीन विक्रीचे ५० हजार रूपये चोरण्याच्या उद्देशातून मध्यरात्रीच्या सुमारास खैरनार यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्यांची चाहूल लागताच खैरनार दाम्पत्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांनी त्यांचे हातपाय पकडले. त्यातील एकाने कुर्‍हाडीने सहादू खैरनार यांच्यावर घाव घातले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर चोरटे पळून गेले. याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी संशयित पंकज चौधरी यास ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात १२ संशयित असून, त्यापैकी पोलिसांनी आठजणांना धुळे, मालेगाव, गुजरातमधून कच्छ, भुज येथून अटक केली.