घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रहेल्मेटसक्तीच्या पहिल्याच दिवशी अडीच लाखांचा दंड

हेल्मेटसक्तीच्या पहिल्याच दिवशी अडीच लाखांचा दंड

Subscribe

नाशिक : हेल्मेटसक्तीच्या पहिल्याच दिवशी शहर पोलिसांनी तब्बल ५५४ विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर कारवाई करत तब्बल २ लाख ७७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या दंडाच्या आकड्यावरुन बेशिस्तीचे प्रमाणदेखील पुढे आले आहे.
शहर पोलिसांनी मुंबईच्या धर्तीवर गुरुवारी सकाळी १० ते १२ आणि सायंकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर कारवाई केली. अनेक वाहनचालकांनी पाचशे रूपये दंड रोख स्वरूपात न दिल्याने पोलिसांनी त्यांना ई-चलनाव्दारे ऑनलाईन दंड पाठविला. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने पोलीस रस्त्यावर उतरल्याने अनेक वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

नाशिकमधील हेल्मेटसक्तीची मोहीम तात्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या बदलीनंतर थंडावली होती. मात्र, पुन्हा गुरुवारपासून (दि.१) या मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली आहे. शहरात हेल्मेट न वापरणार्‍यांविरुद्ध दंडात्मक कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून दुचाकीचालकांना एका आठवड्याची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपल्याने कारवाईला सुरुवात झाली.

- Advertisement -

तात्कालीन पोलीस आयुक्त पाण्डे यांनी वाहतुकीला शिस्त लावण्यासह बेशिस्त वाहचालकांवर अनोख्या प्रकारे कारवाई केली. त्यांनी गेल्यावर्षी तर नो हेल्मेट, नो पेट्रोलचा आदेशही काढला होता. त्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली होती. त्यानंतर शहरातील शासकीय आस्थापना, रुग्णालये, शाळा, महाविद्यालयात हेल्मेट नाही तर सहकार्य नाही हा प्रयोगदेखील राबवला होता. मात्र, पांडे यांची बदली होताच हेल्मेट कारवाई मोहीम थंडावली होती. त्यामुळे शहरात झालेल्या दुचाकी अपघातांतील विनाहेल्मेट वाहनस्वारांच्या मृत्यूचे प्रमाणदेखील वाढल्याचे पोलिसांकडे दाखल आकडेवारीवरुन पुढे आले आहे. मात्र, आता पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दुचाकीचालकांना हेल्मेटची सवय लागावी, यासाठी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

येथे आहेत चेक पॉईंट

पोलिसांकडून शहरात चेकिंग पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत. स्वामी नारायण चौक, संतोष टी पॉईंट, एबीबी सर्कल, अशोकस्तंभ, गरवारे पॉईंट, पाथर्डी फाटा, बिटको चौक, बिटको.

- Advertisement -
कारवाईत सहभागी पोलीस

विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. ही मोहीम मुंबईच्या धर्तीवर राबवली जात आहे. त्यानुसार प्रत्येक चेक पॉईंटवर एक पोलीस, पोलीस निरीक्षक, तीन पोलीस अंमलदार व तीन पोलीस अंमलदार विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर कारवाई करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -