घरताज्या घडामोडीनिर्भय नांगरे-पाटलांची मॅरेथॉन अंगलट.. रंगोत्सवाला तोबा गर्दी

निर्भय नांगरे-पाटलांची मॅरेथॉन अंगलट.. रंगोत्सवाला तोबा गर्दी

Subscribe

लोका सांगे ब्रह्मज्ञान..ची अनुभूती; करोनाकडे दुर्लक्ष करत मंडळांनी घेतला पोलिसांचा आदर्श 

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबर सार्वजनिक कार्यक्रमांमुळे नागरी आरोग्याला बाधा होऊ नये म्हणून खबरदारीचे उपाय योजण्याची जबाबदारी मुख्यत: पोलीस यंत्रणेची आहे. जगभराला करोनाच्या भीतीने पछाडलेले असताना नाशिकचे सुप्रसिद्ध पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी मात्र याच काळात जंगी मॅरेथॉन आयोजित करुन सरकारी आवाहनांनाच आव्हान दिले. नांगरे-पाटील यांना आदर्श मानणारा एक मोठा वर्ग असल्याने त्यांचे अनुकरण करत शहरात कोणत्याही मंडळांनी रंगपंचमी उत्सवाला फाटा न देता यंदाही नेहमीच्या उत्साहात जोरदारपणे हा सण साजरा केला. विशेष म्हणजे स्वत: मॅरेथॉन आयोजित करणार्‍या पोलीस प्रशासनाने रंगोत्सवांच्या कार्यक्रमांना मज्जाव करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यातून शहरात ऐन सणाच्या दिवशी तणाव निर्माण झाला होता.

करोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. भारतासह महाराष्ट्रातही करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गर्दी होणार्‍या सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन टाळल्यास आजाराच्या प्रादुर्भावाचा धोका कमी होईल या अपेक्षेने सरकारी यंत्रणांकडूनही कार्यक्रम रद्द करण्याचे वा पुढे ढकलण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनास प्रतिसाद देत अनेक स्वयंसेवी संस्था, धार्मिक ट्रस्ट यांनी आपले नियोजित कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. काहींनी थेट कार्यक्रमच रद्द करन नवा आदर्श घालून दिला आहे. मात्र, ज्यांच्या आदर्शाची सर्वदूर चर्चा होते त्या पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी मात्र करोनाच्या सावटाखालीही जंगी निर्भया मॅरेथॉन आयोजित करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

- Advertisement -

पोलीस आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या मॅरेथॉनमध्ये हजारो नाशिककरांनी सहभाग घेतला. खरे तर, करोनाच्या भीतीमुळे ही मॅरेथॉन रद्द करावी, अशी अनेकांनी अपेक्षाही व्यक्त केली होती. परंतु या अपेक्षेवर पाणी फेरत मॅरेथॉनमधील काही कार्यक्रम रद्द करण्याचे ‘औदार्य’ दाखवण्यात आले. मात्र, मुख्य ‘इव्हेंट’ वाजत गाजत साजरा करण्यात आला. वास्तविक, पोलीस यंत्रणेनेच जर मॅरेथॉन रद्द केली असती तर त्याचा चांगला संदेश शहरासह जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था आणि मंडळांपर्यंत पोहोचला असता. विशेषत: तरुणांचे ‘आयकॉन’ म्हणून ओळख असलेल्या नांगरे-पाटलांकडून अशा प्रकारच्या आदर्शाची अधिक अपेक्षा होती. पण, ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण’ या उक्तीची प्रत्यक्षात अनुभूती पोलीस आयुक्तांनी नाशिककरांना दिली. मॅरेथॉन रद्द केली तर अधिक भीतीचे वातावरण निर्माण होईल असे कुचकामी कारण पुढे करत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पोलीस आयुक्तांनी घालून दिलेल्या याच ‘आदर्शा’चे अनुकरण करत करोनाच्या सावटातही शुक्रवारी विविध मंडळांनी रंगपंचमीच्या कार्यक्रमांचे जंगी आयोजन करुन समस्त नाशिककरांच्या जीवाला घोर लावला.

नाशिकमध्ये होळीच्या पाचव्या दिवशी म्हणजे पंचमीला राहाडीतल्या रंगात खेळण्याची पेशवेकालीन परंपरा आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी ‘रेन डान्स’चेही आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या सर्वच कार्यक्रमांसाठी पोलिसांनी पूर्व परवानगी दिली असताना ऐन सणाच्या दिवशी हे कार्यक्रम घेण्यात येऊ नये, असे आवाहन ठिकठिकाणी जाऊन पोलिस करताना दिसले. त्यामुळे आयोजक आणि पोलिसांत खडाजंगी होत होती. करोनाच्या साथीची चर्चा सुरू असताना पोलीस मॅरेथॉन आयोजित करु शकतात. मग, आम्ही रंगोत्सव खेळला तर बिघडले कुठे असा सवाल करत आयोजकांनी पोलिसांच्या आवाहनाला उधळून लावले. शास्त्रीय दृष्टीने विचार करता असे मोठे कार्यक्रम न होणे हेच शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह होते. परंतु पोलिस आयुक्तांनीच मोठी मॅरेथॉन आयोजित करुन सार्वजनिक मंडळांना असे जंगी कार्यक्रम आयोजनाचे कुरण मोकळे करुन दिल्याने शहराचे आरोग्य ‘तेल लावत गेल्या’ची अनुभूती नाशिककरांनी घेतली.

- Advertisement -

निर्भया पोलीस मॅरेथॉन आयोजनावेळी आजइतके करोनाचे भितीदायक वातावरण नव्हते. शिवाय, आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, याची देखील आम्ही पुरेपुर काळजी घेतली होती. करोनाचे रुग्ण राज्यात वाढत असल्याने सार्वजनिक रंगपंचमीचे स्वरुप फार मोठे असू नये, यासाठी आम्ही प्रयत्न केले, मंडळांच्या पदाधिकार्‍यांना आवाहन केले. मात्र, रंगोत्सवाला बंदी घातली नाही.
विश्वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -