पिस्तुलचा धाक दाखवत लुटला पेट्रोलपंप; घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील एका पंक्चर दुकान चालकावर तिघा दरोडेखोरांनी चाकूहल्ला चढवित त्यास गंभीर जखमी केले. त्यानंतर थेट साकूरमध्ये जावून पेट्रोलपंपावर दरोडा घालीत २ लाख ५० हजार ७४७ रूपयांची रोकड लुटून पोबारा केला आहे. या घटनेने पठारभागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरोडेखोर पंपावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील पहिली घटना रविवारी (दि.26) रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास घारगाव बसस्थानक जवळील अनुदेव ओटूशेरी यांच्या टायर दुरुस्ती दुकानात घडली. यावेळी एकाच मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी सुरुवातीला दुकान मालकावर चाकूने हल्ला करीत त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर आपल्याकडील पिस्तुल दाखवून त्याच्यावर दहशत निर्माण करीत त्याच्याकडील १ हजार रुपयांची रोकड व मोबाईल हिसकावून घेत त्याची दुचाकी (क्र.एम.एच.17 सी.ए.7207) घेवून तेथून पोबारा केला.

घारगावमधील या घटनेनंतर दोन मोटारसायकलवर बसून हे तिघेही दरोडेखोर तेथून साकूरमध्ये पोहोचले व त्यांनी रात्री साडेदहा ते पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास साकूर ते मांडवे रस्त्यावर असलेल्या आदिकराव खेमनर यांच्या मालकीच्या भगवान पेट्रोलियम या पंपावर जावून सुरुवातीला दोन्ही दुचाकींमध्ये पेट्रोल भरले. त्यानंतर पेट्रोलचे पैसे न देताच ते तिघेही थेट पंपावरील केबिनकडे जावू लागल्याने पेट्रोल भरणारा कर्मचारी विलास भाऊसाहेब कातोरे हा कर्मचारीही त्यांच्यासोबत केबिनमध्ये आले. यावेळी पंपावर सेवेत असलेले सुनील गिर्हे हे दिवसभरातील रोकड जुळवण्याचे व त्याचे बंडल बांधण्याचे काम करीत होते.

पंपाच्या केबीनमध्ये आल्यानंतर त्या तिघांतील एकाने कंबरेचेे पिस्तुल काढून ते विलास कातोरे यांच्यावर रोखत ‘तुमच्याकडे जेवढी रोकड आहे तेवढी गुपचूप काढून द्या; नाहीतर दोघांनाही गोळ्या घालील असा दम भरला’. अचानक उद्भवलेल्या या प्रकाराने पंपावरील दोघेही घाबरले. दरम्यान त्यातील एकाने केबीनमधील टेबलच्या कपाटात ठेवलेली काळ्या रंगाची पिशवी तर दुसर्‍याने सुनील गिरे मोजत असलेला पैशांचा बंडल अशी एकूण 2 लाख 50 हजार 747 रुपयांची रोकडे चोरून पोबारा केला. त्यामुळे याप्रकरणी सुनिल गिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी तिघा अनोळखी दरोडेखोरांविरूद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 93/2023 भादवि कलम 392,394, आर्म अ‍ॅक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार राजू खेडकर हे करत आहे.