घरमहाराष्ट्रनाशिक‘सिव्हिल’मध्ये रुग्णांच्या वेदनांचा खेळ

‘सिव्हिल’मध्ये रुग्णांच्या वेदनांचा खेळ

Subscribe

ऑपरेशन झालेल्या रुग्णांची कमोडअभावी अन्य वॉर्डात धाव

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात शासनाकडून कोट्यवधींचा निधी येत असतानाही रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अतिजोखमीच्या शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णांना मुख्य इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील पुरुष शल्यकक्षात दाखल केले जात असले तरी येथील स्वच्छतागृहाच्या दूरवस्थेमुळे रुग्णांना ओल्या जखमांच्या नरकयातना सहन करत अन्य कक्षात जावे लागते.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील या गंभीर प्रकारामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी रुग्णांची अवस्था झाली आहे. सिव्हिलमध्ये सुरू असलेल्या अनागोंदी प्रकाराची दखल घेऊन आता मुख्यमंत्र्यांनीच न्याय द्यावा, अशी आर्त हाक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक देत आहेत. जिल्हा रुग्णालयातील मुख्य इमारतीच्या दुसरा मजल्यावर पुरुष शल्य कक्ष आहे. या कक्षात विविध आजारांच्या रुग्णांसह अस्थीरोग रुग्णांना शस्त्रक्रिया केल्यानंतर उपचारासाठी दाखल केले जाते. या ठिकाणी रुग्णांना बेड्स, औसधोपचार दिले जातात. मात्र, प्राथमिक गरज असलेल्या स्वच्छतागृहाची प्रचंड दूरवस्था झाली आहे. स्वच्छतागृहातील टॉयलेटचे दार तुटले आहे. जे टॉयलेट उपलब्ध आहेत तेदेखील भारतीय पद्धतीची शौचालये आहेत. त्यामुळे पायासह गुडघे व खुब्याचे ऑपरेशन झालेल्या रुग्णांना या कक्षातील टॉयलेटचा वापर करता येत नाही. परिणामी, दुसर्‍या कक्षातील कमोड टॉयलेटचा वापर करावा लागत आहे. ऑपरेशननंतर जखम ओली असल्याने डॉक्टरांकडून रुग्णांना १४ दिवस कमीत कमी चालण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय, सर्वतोपरी काळजी घेण्यासही सांगितले जाते. मात्र, अस्थिरोग रुग्णांसाठीच्या कक्षात कमोड टॉयलेटच नाही. त्यामुळे रुग्णांची मोठी फरफट होते.

- Advertisement -

या कक्षात कमोड टॉयलेट व्हावे, अशी मागणी एक वर्षापासून केली जात आहे. अद्याप या कक्षात कमोडची व्यवस्था करण्यात आलेली नाही. जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीची दुरुस्ती करताना रुग्णांसाठी कमोडची सुविधा देण्यासाठी रुग्णालयाने तरतूद करण्याची गरज आहे. मुख्य इमारतीतील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालय दुरुस्तीवर उधळपट्टी करण्यापेक्षा आधी रुग्णांच्या प्राथमिक गरजा पूर्ण कराव्यात, अशी मागणी रुग्ण संतोष बंद्रे व त्यांच्या नातेवाईकांनी केली.

ऑपरेशन करण्याच्या वेळात मशीनची दुरुस्ती

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन सुरू असताना एक मशीन नादुरुस्त असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, ज्यावेळी रुग्णावर शस्त्रक्रिया केली जात होती त्याचवेळी ऑपरेशन थिएटरमधील मशीनची दुरुस्ती केली जात होती. या घटनेमुळे रुग्ण व त्याच्या नातेवाईकांमध्ये शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत धाकधूक लागली होती. सुदैवाने निर्विघ्नपणे संबंधित रुग्णावर शस्त्रक्रिया पार पडली. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणे सुस्थितीत असली पाहिजे आणि त्यांची नियमित देखभाल व दुरुस्ती केली पाहिजे, अशी आपेक्षा रुग्ण व त्यांच्याकडून केली जात आहे. ही बाब रुग्णालय यंत्रणेने गांभीर्याने घेतल्यास रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना आधार मिळेल.

- Advertisement -

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -