शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्पा-सेंटरच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय

नाशिक : मसाज सेंटरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय चालवणार्‍या नाशकातील उच्चभ्रू परिसरातील ‘योगे वेलनेस स्पा’वर शहर पोलिसांनी रविवारी (दि. ५) छापा टाकत सहा महिलांची सुटका केली. संशयित आरोपी फरार असून, पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

रविवारी (दि.५) नाशिक शहर मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय करणार्‍या पार्लर चालकांचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुनील माळी यांना शरणपूर रोड येथील सुयोजित मॉर्डन पॉईंट या इमारतीमध्ये संशयित अनेश अरुण उन्हवणे (रा. उपनगर, नाशिक) याने दोन गाळे भाड्याने घेवून त्या ठिकाणी योग वेलनेस स्पा नावाने मसाज पार्लर सुरु केले. मात्र, या ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती माळी यांना मिळाली. त्यानुसार मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांच्यासह पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी पोलिसांना एक महिला व संशयित ललित पांडूरंग राठोड हे महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करुन घेताना आढळून आले. पोलिसांनी सहा पीडित महिलांची सुटका केली.

संशयित अनेश अरुण उन्हवणे, सागर आेंकार अग्रवाल, पियुष आेंकार अग्रवाल हे फरार आहे. सर्वांनी संगनमताने वेश्या व्यवसाय केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.