सुरक्षेचे तीन तेरा; रुंग्ठा ग्रुपच्या साईटवर मजुराच्या पोटात गज

मजुराचा दुर्देवी मृत्यू; जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

नाशिक : कॅनॉल रोडजवळील श्री तिरूमला ओमकार या रुंग्ठा ग्रुपच्या बहुमजली इमारतीचे काम करताना बांधकाम मजुरांच्या सुरक्षेचा कोणताही व्यवस्था न केल्याने एका मजुराच्या मृत्यू झाल्याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. तपासी अधिकारी नितीन पवार यांनी तपास पूर्ण केला असून, दोषारोपपत्रामध्ये रुंग्ठा ग्रुपने मजुरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्षकडे केल्याप्रकरणी पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.

गंगापूर रोडवरील कॅनॉल रोडजवळील श्री तिरूमला ओमकार या बहुमजली इमारतीचे बांधकाम रुंगठा ग्रुप नाशिकमार्फत सुरु होते. १३ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ११.१५ वाजता बांधकामाच्या पाठीमागील बाजूस स्लॅबच्या कामासाठी जमिनीवर असलेले लोखंडी गज दोरखंडास बांधून बिल्डींगच्या सातव्या मजल्यावर चढविण्याचे काम सुरु होते. त्यावेळी मोहम्मद हसरूल आलाम (वय २३) हे काम करत होते. दरम्यान, वरच्या मजल्यावर काम करणार्‍या मजूराच्या हातातील लोखंडी गज निसटल्याने तो तळमजल्यावर काम करणार्‍या मोहम्मदच्या शरीरात घुसला.

या घटनेत त्याचा मृत्यू झाला. गज पोहचविणेसाठी लागणारी लिफ्ट अथवा संरक्षित जाळी किंवा अन्य यंत्रसामग्री आणि मजूरांच्या सुरक्षेकरीता असलेले साहित्य वरील संशयितांनी मजूरांना वापरायला दिले नसल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे मजूराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पुरुषोत्तम कांतीलाल मावानी, सुपरवायझर नयन छाब्रिया व इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार शंकर तानाजी झाडे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयितांवर गुन्हे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार यांनी केला.

पवार यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले. तसेच, साक्षीदारांच्या साक्षी घेतल्या. त्यात रुंग्ठा ग्रुपचा हालगर्जीपणा दिसून आला. या ग्रुपतर्फे मंजुरासाठी कोणतीही सुरक्षेसाठी व्यवस्था करण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे. गंगापूर पोलीस ठाण्यातर्फे ३ डिसेंबर २०२१ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात रुंग्ठा ग्रुपच्या संबंधित व्यक्तींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या सुनावणी व निकालाकडे मंजुरांसह नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

रुंग्ठा ग्रुपच्या श्री तिरूमला ओमकार या बहुमजली इमारतीचे काम करताना बांधकाम मजुरांच्या सुरक्षेचा विचार न करता त्यांना काम करण्यास भाग पाडल्याचे तपासात समोर आले. काम करताना एका मजूराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला असून, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. -रियाज शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गंगापूर पोलीस ठाणे

तक्रारींची मालिका

इमारतींना मोठमोठ्या सुविधा देण्याच्या बढाया मारणार्‍या या ग्रुपच्या लेखी मोल-मजुरांच्या जीवाला काहीही किंमत नाही का असा प्रश्न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. हा केवळ अपघात होता, असे सांगत आता सारवासारव केली जात असली तरी ग्रुपमधील प्रमुख अधिकारी स्वत:च्या बाबतीत असा निष्काळजीपणा करतील का, असाही प्रश्न निर्माण होतो. या ग्रुपच्या एकूणच कार्यपद्धतीविषयी विविध तक्रारी ‘आपलं महानगर’ला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची शहानिशा करुन लवकचर या संदर्भात वृत्त मालिका प्रसिद्ध करण्यात येईल.