आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन

नाशिक : आदिवासी समुदायाच्या मानवी अधिकाराचे संरक्षण व्हावे, संस्कृतीचे रक्षण करणे, त्यांचा जल-जंगल आणि जमिनीवरील अधिकार अबाधित राहावा, त्यांची विशिष्ट संस्कृती, ओळख, हक्क आणि अधिकाराची ओळख, सामाजिक ऐक्य, अस्तित्व, स्वाभिमान, आत्मसन्मान, अस्मिता, कायम राहावी यासाठी व्यापक जनजागृती आणि प्रयत्नांची आवश्यकता लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाकडून हा दिवस दरवर्षी ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त नाशिक शहरातही आदिवासी बांधवांनी रॅली काढली.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त मंगळवारी नाशिक जिल्हयात आदिवासी संघटनांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त नाशिकच्या पंचवटी कारंजा ते गोल्फ क्लब मैदान पर्यंत वाजत गाजत आदिवासी बांधवांकडून रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये आदिवासी बांधवांकडून त्यांची पारंपरीक वेशभूषा धारण करून पारंपरीक वाद्यावर नृत्य साजरे करण्यात आले , तर दुसरीकडे ढोल ताश्यांच्या गजरात नाचत गाजत आदिवासी दिनानिमित्त ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी चौकाचौकात असलेल्या महापुरूषांच्या पुतळ्यांना आदिवासी संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन देखील करण्यात आले. पंचवटी कारंजा पासून निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आणि तरुणाई ही सहभागी झाली होती तर एकाच जल्लोष आणि उत्साह हा या रॅलीत पहायला मिळाला आहे.

पारंपारिक वेशभूषेतील आदिवासी बांधव, गोंडी नृत्य, गोंडी गाण्याच्या तालावर आदिवासी संस्कृतीचे दर्शन या रॅलीच्या माध्यमातून घडले. आदिवासी बांधवांकडून पारंपारिक नृत्यासोबतच विविध कला गुणांचे सादरीकरणही करण्यात आले. आदिवासी समाजाच्या रूढी परंपरा व चालीरिती याबाबत यावेळी तरूणांना माहिती देण्यात आली.