घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगंगापूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मित्रांसमवेत गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मित्रांसमवेत गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

Subscribe

नाशिक : मित्रांसमवेत आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.२३) दुपारी ३ वाजेदरम्यान सावरगाव बॅक वॉटर, गंगापूर धरण येथे घडली. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. यश रमेश चक्रधर (वय १८, रा. संत कबीर नगर, भोसला मिलिटरी स्कूलजवळ, नाशिक) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व यशच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, यशने मंगळवारी दुपारी घरी जेवण केले. त्याने घराबाहेर जाण्यापूर्वी डान्स क्लासवरून लवकर परत येतो, असे आईला सांगत घराबाहेर गेला. मात्र, तो डान्स क्लासला न जाता चार मित्रांसमवेतदुपारी ३ वाजेदरम्यान सावरगाव बॅक वॉटर, गंगापूर धरण परिसरात आला. या ठिकाणी सर्वजण आंघोळीसाठी पाण्यात उतरले. यशला पोहायला येत नसताना तो पाण्यात उतरला. सर्व मित्र पाण्याबाहेर आले तरी तो पाण्याबाहेर येत नव्हता.

- Advertisement -

मित्रांनी त्याला पाण्याबाहेर येण्यास सांगितले असता तो आणखी खोल पाण्यात गेला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. ही बाब मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड सुरु केली. त्याला भारत रमेश चक्रधर यांनी पाण्याबाहेर आणले. मित्रांनी यशच्या नातेवाईकांशी संपर्क साधत यश पाण्यात बुडाल्याचे सांगितले. ही बाब नातेवाईकांना समजताच ते बॅक वॉटर परिसरात आले. त्याला संपत राधाकिसन चक्रधर यांनी उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. पुढील तपास नाशिक तालुका पोलीस करीत आहेत.

डान्सर होण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण

यशला डान्सर व्हायचे. त्यासाठी तो डान्सच्या क्लासला जात होता. त्याचे वडील स्विगी फूड डिलिव्हरीचे काम करतात. यश मनमिळावू आणि हुशार असल्याने सर्वांचा लाडका होता. त्याच्या पश्चात आई, वडील व एक लहान भाऊ असा परिवार आहे. त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समजताच संत कबीर नगरमधील नागरिक व त्याच्या नातेवाईकांच्या जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. यावेळी त्याच्या आई व नातेवाईकांनी हंबरडा फोडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -