घरमहाराष्ट्रनाशिकमहापालिकेच्या अंगणवाड्यांमध्ये ‘आधारास्त्र’

महापालिकेच्या अंगणवाड्यांमध्ये ‘आधारास्त्र’

Subscribe

दोन ठिकाणी नावे असलेले विद्यार्थी कळणार, विद्यार्थीसंख्या जाणून घेण्यासाठी आयुक्तांचे महत्वाचे पाऊल

विद्यार्थ्यांची दुबार नावे हटकण्यासाठी आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची खरी संख्या पुढे आणण्यासाठी महापालिका आयुक्तांनी ‘आधारास्त्र’ उपसले आहे. या माध्यमातून महापालिकेच्या अंगणवाड्या आधारला लिंक केल्या जाणार आहेत. शिवाय प्रत्येक अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची आधारनोंदणी केली जाणार आहे. दोन अंगणवाड्यांमध्ये नावे आहेत, असे विद्यार्थी यामुळे पुढे येऊ शकतील.

शहरात एकात्मिक बालविकास केंद्र (आयसीडीएस) आणि महापालिकेच्या मिळून ४१२ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांमध्ये जवळपास १२ हजार बालके शिक्षण घेतात. या मुलांना शिक्षणसह पोषण आहारही दिला जातो. त्यामुळे झोपडपट्टीतील मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाणही कमी होते; परंतु पटसंख्या कमी असलेल्या आणि समान हजेरीपट असलेल्या तब्बल १३६ अंगणवाड्यांना तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गेल्या शैक्षणिक वर्षापासून कायमस्वरुपी टाळे लावले आहे. यातील ५३ अंगणवाड्यांच्या हजेरीपटात मोठा घोळ आढळून आला असून त्यात एक लाभार्थ्याचे नाव हे दोन ते तीन अंगणवाड्यांमध्ये आढळून आले होते. इतर ४३ अंगणवाड्यांमध्ये २५ पेक्षा कमी पटसंख्या आढळून आली होती. त्यामुळे या १३६ अंगणवाड्या कायमस्वरुपी बंद केल्याने यात कार्यरत असलेल्या १३६ सेविका व तेवढ्याच मतदनीस, अशा २७२ मानधनावरील अंगणवाडी कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्यात आले.

- Advertisement -

या निर्णयामुळे महापालिकेचे पावणेदोन कोटी रुपये वाचले खरे; परंतु बचतीच्या नावाखाली गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची एकमेव व्यवस्था अंगणवाड्याही बंद केल्याने त्याला विविध पातळ्यांवरुन जोरदार विरोधही झाला. त्याचप्रमाणे अंगणवाडी कर्मचार्‍यांनी महापालिकेवर मोर्चा आणून रात्री उशिरापर्यंत उपोषणही केले होते. त्यामुळे अंगणवाड्या पुर्ववत सुरू करण्याची घोषणा महापौर रंजना भानसी यांनी केली होती. तरीही अंगणवाडीतील विद्यार्थी संख्येचा प्रश्न सुटला नाही. हा प्रश्न सामोपचाराने सोडविण्यासाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अर्थात तत्पूर्वी अंगणवाडीतील विद्यार्थी संख्येची शहनिशा होणार आहे. त्यासाठी आधारचा वापर केला जाणार आहे.

आठ यंत्रांद्वारे आधार नोंदणी

महापालिकेने जिल्हाधिकार्‍यांकडे सहा विभागात प्रत्येकी पाच याप्रमाणे ३० आधार यंत्रांची मागणी केली होती. जिल्हाधिकार्‍यांनी तूर्तास आठ यंत्र देण्यास तयारी दर्शविली आहे. या यंत्रांद्वारे आधार नोंदणी न झालेल्या बालकांची नोंदणी केली जाणार आहे.

- Advertisement -

काय आढळले पाहणीत

अनेक अंगणवाड्यांमध्ये पटसंख्या अत्यंत कमी होती. ५३ अंगणवाड्यांच्या हजेरीपटात घोळ आढळून आला होता. या अंगणवाड्यांमध्ये एक लाभार्थी दोन ते तीन ठिकाणी लाभ घेत असल्याचे आढळून आले होते. त्यात १,०३६ मुले समान आढळून आली होती. १११ अंगणवाड्यांमध्ये प्रत्येकी केवळ ४ ते १४ विद्यार्थीच असल्याचे आढळून आले. खासगी जागेतील अंगणवाड्यांची अवस्था तर अत्यंत वाईट होती. एकाच योजनेचा लाभ घेत असल्याने या सर्व ५३ अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेत येथील समान लाभार्थ्यांना एकात्मिक बाल विकास विभागाच्या अंगणवाड्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. पटसंख्या कमी असलेल्या ४३ अंगणवाड्यांमधील लाभार्थी मुलांना जवळच्या अंगणवाड्यांमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -