बाईकटॅक्सी विरोधात ‘आप’ आक्रमक; अवैध असल्याने कारवाईची मागणी

नाशिक : शहरात अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या बाईक, टॅक्सी बंद कराव्यात, अशी मागणी प्रादेशिक परिवाहन कार्यालयात आम आदमी रिक्षा संघटनेतर्फे निवेदनाव्दारे करण्यात आली. यावेळी दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याचे आश्वासन परिवहन अधिकारी वासुदेव भगत दिले.

नाशिक शहरात अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या बाईक टॅक्सी चालकांची संख्या वाढली आहे. कोणताही परवाने नसताना दुचाकीस्वार नाशिक शहरात वाहतूक करताना आढळत आहेत. त्यामुळे नाशिकच्या रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. आम आदमी रिक्षा संघटनेतर्फे अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या बाईक टॅक्सी बंद कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी आम् आदमी रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष समाधान अहिरे, संघटनेचे सचिव नितिन रेवगडे, गोकुळ मांडोळे, रघुनाथ शेळके, गणेश पवार, सुनील तायडे आदी रिक्षा चालक व पदाधिकारी उपस्थित होते.

काय आहे बाईक टॅक्सी ?

शहरात सार्वजनिक वाहतुकीसाठी बस, रिक्षाच्या जोडीला खाजगी ओला, उबेर या कंपन्यांच्या टॅक्सी आणि रिक्षा सुविधा उपलब्ध आहेत. टॅक्सीमध्ये ४ आणि रिक्षात ३ प्रवासी प्रवास करू शकतात. पण आता त्याहून स्वस्त आणि एका व्यक्तीसाठी नव्याने बाईक द्वारे आपल्या इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी दुचाकीद्वारे प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. देशात याआधी फक्त गोव्यात ही सेवा होती. परंतु आता देशातील १०० शहरात ही सुविधा सुरू झाली आहे. तिला प्रतिसादही उत्तम मिळतोय.