घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमविप्र निवडणुकीत जाणवते विनायकदादांची उणीव

मविप्र निवडणुकीत जाणवते विनायकदादांची उणीव

Subscribe
हेमंत भोसले । नाशिक

तब्बल १०८ वर्षांची उज्वल परंपरा लाभलेल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीला एव्हाना रंगत आली खरी; मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याच्या नादात संस्थेची बदनामीही होत असल्याची बाब निवडणुकीत सक्रीय असलेले ‘समाजधुरिण’ समजून घ्यायला तयार नाहीत. वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या पश्चात निवडणुकीत समन्वयकाचा ‘रिमोट कंट्रोल’ दुर्देवाने कुणाच्याही हाती गेेला नाही. परिणामी निवडणुकीत सभ्यतेचे नियंत्रण सुटते की काय, याचीही खंत संस्थाप्रेमींना डाचू लागली आहे.

काळाप्रमाणे संस्थेची ध्येय-धोरणे बदलत गेली. संस्थेची शाळा, महाविद्यालये ग्रामीण भागापर्यंत जाऊन पोहोचली आणि शताब्दी पार केलेली ही संस्था जिल्ह्यातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था बनली. अर्थात, काळ बदलत गेला तसे संस्थेत काही गुण-अवगुणही अवतरले. माणसे बदलली, येथील समाजकारणाने राजकारणाचे स्वरूप धारण केले, संस्थेत पैसा पाण्याप्रमाणे वाहू लागला तसा येथील लोकांच्या वृत्तीतही बदल होत गेला. आज संस्था यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचलीय. अत्याधुनिक इमारती उभ्या राहिल्यात, नवनवीन अभ्यासक्रम सुरू झालेत. पण संस्थेत शिरलेल्या राजकारणाच्या किड्याने संस्थेचा पायाच पोखरायला सुरुवात केली.

- Advertisement -

कर्मवीरांनंतर संस्थेला कोण मार्गदर्शन करणार असा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हाच एकमताने वनाधिपती विनायकदादांचे नाव पुढे आले. विशेषत: डॉ. वसंत पवार यांच्या निधनानंतर संस्थेच्या हितासाठी दादांनी महत्वपूर्ण भूमिका वठवली. त्यांचा प्रेमळपणा, आपुलकी व नाते जपण्याचा स्वभाव संस्थेच्या प्रगतीला प्रेरक ठरू लागला. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांत दादांनी घेतलेल्या ठोस भूमिका सभासदांसह संस्थाप्रेमींच्या सदैव स्मरणात राहतील. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारे वाद शमविण्यासाठी दादा पूर्ण ताकदीने प्रयत्न करत. इतकेच नाही तर प्रचाराच्या नादात संस्थेची बदनामी होऊ नये, या स्वच्छ उद्देशाने ते बिनविरोध निवडणुकीसाठीही आग्रही राहत. परंतु, त्यांच्या आग्रहामागचे कारण मात्र कुणी समजून घेतले नाही आणि निवडणूक बिनविरोध करण्याचे दादांचे स्वप्न स्वप्नच राहिले. संस्थेचे सभासद, त्यांचे नातेगोते, अंडरकरंट, भागवाद यासंदर्भात दादांचा अभ्यास कमालीचा होता. त्यामुळे निवडणुकीच्या काळात त्यांनी दिलेले सल्ले उमेदवाराच्या हिताचेच ठरत. त्यांची भूमिका संभ्रमीत करणारी कधीही नव्हती. डॉ. वसंत पवार यांच्यानंतर संस्थेची धुरा नीलिमाताईंच्या हातात देण्यासाठी त्यांनीच प्रयत्न केले. परंतु सरचिटणीसपदावरुन कायदेशीर वाद जेव्हा सुरू झाला तेव्हा विनायकदादांनी अधिकारवाणीने नीलिमाताईंना पदावरुन दूर होण्याचा सल्ला दिला. त्यानंतरच्या निवडणुकीत दादांनी वडिलकीच्या नात्याने नीलिमाताईंना भक्कम साथ दिली.

महत्वाचे म्हणजे दुसर्‍या निवडणुकीत नीलिमाताई सक्षमपणे निवडणुकीला सामोरे जाऊ लागल्या तेव्हा दादांनी निवडणुकीतील त्यांचा सहभाग स्वत:हून कमी करत मोठेपणा दाखवला. माणिकराव कोकाटे, शिरिष कोतवाल, माणिकराव बोरस्ते या समाजधुरिणांनी तिसरे पॅनल तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या तेव्हा मात्र विनायकदादांनी पुन्हा पुढाकार घेत या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली व तिढा सोडवला. दादांनी नीलिमाताईंना भक्कम साथ दिली असली तरी दुसरीकडे अ‍ॅड. नितीन ठाकरे व त्यांच्या पॅनलच्या आड येण्याचे प्रयत्नही त्यांनी केले नाहीत. याउलट वेळप्रसंगी अ‍ॅड. ठाकरे यांनाही मार्गदर्शन करण्याची भूमिका दादांनी घेतली. दादांकडे दोन्ही पॅनलचे उमेदवार आशिर्वाद घेण्यासाठी येत तेव्हा गंमतीने दादांना ‘नाशिकचे ग्रामदैवत’ असे संबोधले जात. दादांनी कोणत्या पॅनलचा उमेदवार आहे याचा विचार न करता प्रामाणिकपणे सल्ले दिले. त्यामुळे उमेदवारांनाही प्रचाराची दिशा मिळायची. त्यांच्याप्रतीचा आदर हा प्रत्येकाच्याच मनात असायचा. ‘तू घाबरू नकोस’ हे त्यांचे सतत सांगणे असायचे. प्रत्येक प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर असायचे. त्यामुळेच त्यांनी प्रत्येकाशी स्नेह निर्माण केला होता.

- Advertisement -

..तर नाराजीनाट्य झाले नसते

दादा आणि शरद पवारांची मैत्री सर्वश्रुत आहे. ‘पुलोद’ मंत्रिमंडळात शरद पवार यांचे ते सहकारी होते. या मैत्रीचा फायदा संस्था वाढीसाठी त्यांनी निश्चितपणे घेतला. गेल्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाला एकत्र करुन राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी दादांनी मनापासून प्रयत्न केले. त्यात त्यांना चांगले यशही आले. परंतु, मविप्रच्या सत्ताधार्‍यांकडून त्यांना फारसा प्रतिसाद दिसला नाही. तरीही त्यांनी पदाधिकार्‍यांविरोधात कोणत्याही व्यासपीठावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली नाही. गेल्या महिन्यात श्रीराम शेटे यांच्या उमेदवारीवरुन शरद पवारांनी जाहीरपणे नाराजी दर्शवली. ती नाराजी विनायकदादा असते तर कदाचित बाहेरही पडली नसती. त्यानंतर निवडणुकीत प्रचाराने जी मर्यादा ओलांडली, ती दादा असते तर कुणी सोडली नसती. कुणी तसा प्रयत्नही केला असता तर दादांनी अधिकारवाणीने संबंधिताचा कान पिळला असता. दादांच्या जाण्यानंतर संस्थेचा आधारवड हरपल्याची जाणीव निवडणुकीत प्रकर्षाने होत आहे. निवडणुकीत दोन्ही पॅनलमध्ये समन्वय साधणारा समाजधुरिण आता उरला नाही. त्यातून निवडणूक सैराट झाली आहे. वाद-प्रतिवादापर्यंत ही निवडणूक आज मर्यादीत असली तरीही एकूणच हालचाली बघता हाणामार्‍यांपर्यंत ही निवडणूक पोहोचते की काय, अशी भीती अनेकांना त्रस्त करत आहे. त्यातून विनायकदादांच्या स्मृतींना ठिकठिकाणी उजाळा मिळाला नाही तर नवल !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -