मजुरीचे पैसे मागितल्याने कामगाराला शिवीगाळ, मारहाण

मॅनेजरसह एकावर गुन्हा दाखल; अंबड येथील घटना

मजुरीचे पैसे मागितल्याच्या कारणातून मॅनेजरसह एकाने मजुराला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि.१९) दुपारी ३.३० वाजेदरम्यान सुदाल इंडस्ट्रीज, अंबड येथे घडली. याप्रकरणी शमसुद्दीन शेख यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित मॅनेजर राऊत, संतोष यादवविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शमसुद्दीन शेख मजुरीचे पैसे मागण्यासाठी सुदाल इंडस्ट्रीजमध्ये आले होते. त्यांनी मॅनेजर राऊतकडे मजुरीच्या पैशांची मागणी केली. राग अनावर झाल्याने मॅनेजर व संतोष यादव याने शेख यांना शिवीगाळ करत रॉडने मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गवांदे करत आहेत.