राज्यपालांच्या बंदोबस्तावरुन येताना पोलिसांच्या गाडीला अपघात

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या नंदुरबार जिल्हा दौर्‍यानिमित्त बंदोबस्तासाठी आलेल्या नाशिक ग्रामीण पोलिसांच्या गाडीला शुक्रवारी (दि.२१) अपघात झाला. या अपघातात १० पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. ही घटना नंदुरबार शहराजवळील पथराई गावाजवळ घडली. जखमी पोलिसांना उपचारासाठी नंदुरबारमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

राज्यपालांनी २०१५ मध्ये भगदरी (ता.अक्कलकुवा, जि.नंदुरबार) दत्तक घेतले आहे. गुरुवारी (दि.२०) दत्तक गावाला भेट देवून पाहणी करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यानिमित्त परजिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता. नाशिक ग्रामीण पोलीस दलातील पोलीस धडगाव (जि.नंदुरबार) येथे बंदोबस्ताला होते. बंदोबस्तानंतर सर्वजण पोलीस गाडीने नंदुरबारला परत येत होते. नंदुरबारजवळी पथराई गावाजवळ गाडी आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. चालकाने प्रसंगावधान राखत दुसर्‍या वाहनांना धडक होवू नये, यासाठी गाडी रस्त्याच्या खाली आणली. त्यामुळे गाडी रस्त्याजवळील खड्ड्यात आदळली. गाडीत 18 पोलीस कर्मचारी होते. त्यातील 10 पोलीस किरकोळ जखमी झाले. जखमी पोलिसांना उपचारासाठी नंदुरबारमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.