भीषण अपघात: देवळ्यात कार-मोटरसायकल अपघातात एकाच कुटुंबातील चौघे ठार

मृतांमध्ये आई, वडील, भाऊ, बहीण यांचा समावेश, उपचारासाठी नेले जात असताना मुलीचा मृत्यू

Deola Accident

देवळा – देवळा-नाशिक मार्गावर असलेल्या दुर्गा हॉटेलजवळ कार आणि मोटरसायकल यांच्यात शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघे ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृतांमध्ये आई, वडील, भाऊ, बहीण यांचा समावेश आहे.

रामेश्वर येथील हिरे कुटुंबातील गोपीनाथ साळूबा हिरे सहकुटुंब मोटरसायकलवरुन (एमएच-४१, के-५६६१)ने शेतीची कामे आटोपून रामेश्वर येथे निघाले होते. दुर्गा हॉटेलनजीक नाशिककडून देवळ्याकडे येत असलेल्या अर्टिगा कार (एमएच ४३, एएल-३००९) आणि मोटरसायकल यांच्यात हा अपघात झाला. या भीषण अपघातात गोपीनाथ साळूबा हिरे (वय ४२) यांच्यासह पत्नी मंगलाबाई गोपिनाथ हिरे (३५), मुलगा गोरख गोपीनाथ हिरे (१६), मुलगी जागृती गोपीनाथ हिरे (१८) यांचा मृत्यू झाला. देवळा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, अपघातात जागृती गंभीर जखमी होती. तिला मालेगाव येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात येत असताना तिचा मृत्यू झाला. अपघातात संपूर्ण कुटुंब मृत्यूमुखी पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.