नाशिकच्या नवविवाहित दाम्पत्याचा अमेरिकेत अपघाती मृत्यू

पृथ्वीराज पाटील हा अ‍ॅपल कंपनीत सिनिअर सॉफ्टवेयर इंजिनियर तर डॉ. श्रावणी पृथ्वीराज पाटील यांचा वैद्यकीय व्यवसाय होता.

नाशिक : अमेरिकेत स्थायिक असलेल्या नाशिकच्या दाम्पत्याचा रविवारी (दि.२२) सकाळी अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. भरधाव कारवर नियंत्रण मिळवता न आल्याने कारचा अपघात झाला. त्यानंतर कार पोलला धडकत पेटल्याने दाम्पत्याचा मृत्यू झाला. पृथ्वीराज पाटील (वय ३२), डॉ. श्रावणी पृथ्वीराज पाटील (वय ३०) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

इंडीयन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री पाटील यांचा मुलगा पृथ्वीराज आणि सून डॉ. श्रावणी हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे स्थायिक झाले होते. पृथ्वीराज पाटील हा अ‍ॅपल कंपनीत सिनिअर सॉफ्टवेयर इंजिनियर होता. तर डॉ. श्रावणी पृथ्वीराज पाटील यांचा वैद्यकीय व्यवसाय होता. सहा महिन्यांपुर्वीच दोघांचा अमेरिकेत विवाह झाला होता. डॉ. राजश्री पाटील या डिसेंबर २०२१ मध्ये महिन्याभर मुलाच्या लग्नानिमित्त होत्या. डॉ. श्रावणी पाटील या मूळच्या पुण्याच्या आहेत. डॉ. राजश्री पाटील यांची मुलगीसुद्धा अमेरिकेत एमएस करत आहे.