घरताज्या घडामोडीघोटीत भरगर्दीत तरुणाचा खून

घोटीत भरगर्दीत तरुणाचा खून

Subscribe

डांगी जनावरांच्या प्रदर्शनाला गालबोट, संशयित ताब्यात

घोटी येथे भरलेल्या डांगी संकरित जनावरांच्या प्रदर्शनात टोळक्याने एका तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.१५) घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांना जागेवरच ताब्यात घेतली असून, घटनेमुळे या प्रदर्शनाला गालबोट लागले आहे. विनोद मच्छिंद्र तोकडे (२०, रा. देवळे, ता. घोटी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

विनोद आपल्या मित्रांसोबत प्रदर्शन पाहण्यासाठी आला होता. यावेळी माणिकखांब (इगतपुरी) येथील संशयित आरोपी आकाश ज्ञानदेव चव्हाण (२०), सागर गोविंद चव्हाण (२०), रामदास उर्फ राम बाळू चव्हाण (१९), रवींद्र बाळू चव्हाण (१९), अनिकेत अंबादास चव्हाण (२०), अमोल रामदास चव्हाण (२०), जगन राज चव्हाण (१९) यांनी अचानक विनोदवर हल्ला केला. या टोळक्याने लोखंडी रॉड मारल्याने विनोद गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. त्यानंतरही या टोळक्याने अमानुषपणे मारहाण सुरू ठेवली व पोटात चाकू भोसकून खून केला. भरप्रदर्शनात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांची पळापळ सुरू झाली. गर्दीचा फायदा घेत संशयित पळ काढण्याच्या तयारीत असतानाच, घटनास्थळी तातडीने पोहोचलेल्या पोलिसांच्या पथकाने संशयितांना ताब्यात घेतले. सर्व आरोपी हे १९ ते २० वयोगटातील असूनही, थेट खून करण्याचे धाडस त्यांनी केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी तातडीने परिसरातील मनोरंजनपर कार्यक्रम आणि दुकाने बंद करत नागरिकांना शांततेचे आवाहन केले. रात्री सर्व संंशयितांना घोटी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -