५ वर्षे फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

पोलिसांना गुंगारा देत पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली. वीरेंद्र वीरबहादूर कौशल (व्य ४२, रा.फ्लॅट क्रमांक ३०३, साईतीर्थ अपार्टमेंट, जेलरोड, नाशिकरोड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

म्हसरुळ पोलीस ठाण्यात फसवणूक प्रकरणातील आरोपी २०१६ पासून फरार होता. तेंव्हापासून नाशिक शहर पोलीस त्याच्या मागावर होते. तो मंगळवारी (दि.१८) बिटको पॉईंट, नाशिकरोड येथे येणार असल्याची माहिती नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकास मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखली पथकाने आरोपीला पकडण्यासाठी बिटको पॉईंट परिसरात सापळा रचला. तो बिटको पॉईंट परिसरातील धनलक्ष्मी हॉटेलसमोर आला असता पथकाने त्याला ताब्यात घेतले. पोलीस तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासासाठी पथकाने त्याला म्हसरुळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.