जिल्हाधिकार्‍यांनी घेतली अधिकार्‍यांची झाडाझडती

अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात कारवाईचे निर्देश

नाशिक : परवाने नसताना गौणखनिज वाहतूक कशी होत आहे. जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी महाखनिज प्रणालीच्या अ‍ॅपव्दारे अनधिकृत गौणखनिज वाहनांची तपासणी करत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अवैध गौण खनिज वाहतूकीविरोधात रस्त्यावर उतरून कारवाई करा, मला रिझल्ट द्या, असे सुनावत जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी इतरही विभागांचा आढावा घेत अधिकार्‍यांची कानउघाडणी केली.

जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी महसूली कामाकाजात सुधारणा करण्यासाठी कठोर पाऊले उचलली आहेत. याची प्रचिती मंगळवारी (दि.१०) झालेल्या उपविभागीय अधिकार्‍यांच्या बैठकीत आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीत विविध खात्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी गौणखनिज विभागाला चांगलेच धारेवर धरले.
अवैध गौणखनिज वाहनांवर केलेली कारवाई यांचा आढावा घेत मंडळ अधिकारी, तहसीलदार यांना रस्त्यावर उतरुन अनधिकृत गौणखनिज वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश देत चांगलेच खडसावले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांच्या त्रुटी दाखवून देत अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे समजते.

बैठकीला मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) भीमराव दराडे यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख, कक्ष अधिकारी आदी उपस्थित होते.