आदित्य ठाकरे यांनी साधला पिंपळगाव ग्रामसेवकांशी संवाद

माझी वसुंधरा अभियानांतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार पिंपळगावला

Aditya Thackeray interacted with Pimpalgaon Gramsevaks

माझी वसुंधरा अभियानांतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून पिंपळगावला पुरस्कार मिळाल्याबद्दल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ग्रामसेवकांचे अभिनंदन करत ऑनलाईन संवाद साधला.

कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन, ओझोन जनजागृती अशा अनेक उपक्रमातून पिंपळगाव ग्रामपंचायतीने सहा-सात महिन्यांत काम केले. याच कामाची पावती म्हणून पिंपळगाव ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून या कामाचा आढावा घेत ग्रामसेवक लिंगराज जंगम व सरपंच अलका बनकर यांना पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, अभिनेते अमिर खान, पानी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकल उपस्थित होते. माझी वसुंधरा अभियानातील विभाग स्तरावरील पुरस्कार विजेते विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह पुणे, सातारा, अहमदनगर, जळगाव, नाशिकचे जिल्हाधिकारी, व जळगाव, अहमदनगर, नाशिक येथील जिल्हा परिषदांचे सीईओ, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आयुक्त, मुख्याधिकारी व ग्रामसेवक हेही सहभागी झाले होते.

यावेळी ठाकरे यांनी स्थानिक संस्थांनी माझी वसुंधरा अंतर्गत केलेल्या कामांची माहिती घेतली.
आमीर खान यांनी माझी वसुंधरा अभियानातून हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. या अभियानाच्या माध्यमातून अत्यंत मुलभूत प्रश्नांवर काम करण्यात येत आहे. वातावरणीय बदलासंदर्भात चित्रपटांद्वारे बनवून त्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करता येईल. यासंदर्भात विचार करू, असेही त्यांनी सांगितले.