घरताज्या घडामोडीकरोना व्यवस्थापनासाठी प्रशासनाचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

करोना व्यवस्थापनासाठी प्रशासनाचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

Subscribe

नाशिक शहरात दिवसेंदिवस करोना रूग्णांची वाढती संख्या विचारात घेता आता जिल्हाधिकार्‍यांनी करोना व्यवस्थापनासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. याअंतर्गत मालेगावच्या धर्तीवर इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरची स्थापना करण्यात येउन प्रत्येक बाबींसाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच खाजगी रूग्णालयांत उपचार घेत असतांना येणार्‍या तक्रारींची सोडवणुक करण्यासाठी प्रत्येक स्तरावर तक्रार निवारण कक्षही स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

करोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील वाढत्या करोना बाधितांच्या संख्येबाबत चर्चा करण्यात आली तसेच आतापर्यंत करोना नियंत्रणासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजना आणि आलेल्या अडचणींसंदर्भात चर्चा करण्यात आली. विशेष करून शहरात करोना रूग्णांची वाढती लक्षात घेता मालेगावच्या धर्तीवर शहरासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ निश्चित करण्यात आला. यामध्ये प्रत्येक बाबींसाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली. याबाबत बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, करोना व्यवस्थापन आणि नियंत्रणासाठी मालेगावच्या धर्तीवर नाशिकमध्ये देखील इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये करोनाची लक्षणे आढळणार्‍या रूग्णांचे स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येण्यास होणारा विलंब विचारात घेता वेळेत नमुने पाठवणे, चोवीस तासांत अहवाल प्राप्त करून घेणे तसेच समन्वय ठेवणे, लॅबसाठी आवश्यक सामग्रीचे नियोजन करण्याबाबत जबाबदार्‍या निश्चित करण्यात आल्या.

- Advertisement -

पावसाळा सुरू झाला असून करोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता रूग्णांच्या उपचारात कोणतेही अडथळे येउ नये याकरीता सरकारी तसेच खाजगी रूग्णालयांत अतिरिक्त बेडची व्यवस्था करण्याबाबतच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. अनेकदा रूग्णांकडून खाजगी रूग्णालयांबाबत तक्रारी प्राप्त होतात जसे की, योग्य उपचार न मिळणे, जादा बील आकारणी करणे याकरीता तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येणार असून याव्दारे समस्यांचे निराकरण केेले जाईल असे त्यांनी सांगितले. सर्व रूग्णालयांमधे महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. कोविडसाठी राखीव खाजगी रूग्णालयांमध्येही या योजनेचा लाभ रूग्णांना दिला जाईल. तसेच अतिदक्षता विभागाचे व्यवस्थापन, बायोमेडीकल वेस्टेज नियोजन, आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे यासाठी जबाबदार्‍या निश्चित करण्यात आल्या आहेत. दर आठवडयाला याबाबतचा आढावा जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांच्या स्तरावर घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीत करोना नियंत्रणासाठी इर्मजन्सी सेंटरची स्थापना करण्यात येउन सर्व यंत्रणांमध्ये समन्वय कसा राहील याकरीता जबाबदार्‍या निश्चित करण्यात आल्या. यात काही डॉक्टरांची देखील मदत घेत आहोत. अतिदक्षता विभागाचे मॅनेमेंट करत असतांना वरीष्ठ डॉक्टरांशी वेळोवेळी चर्चा करून रूग्णांच्या प्रकृतीविषयी अधिक खबरदारी घेण्यात येणार आहे. करोना नियंत्रणासाठी महापालीकेच्या माध्यमातून यंत्रणा काम करत आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातूनही महापालीकेला सर्व सहाय्य करण्यात येईल. निश्चितपणे मालेगाव प्रमाणे नाशिकमधील करोना रूग्णसंख्या देखील नियंत्रणात येईल.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -