घरताज्या घडामोडीमुक्त विद्यापीठातील 4246 विद्यार्थ्यांचे प्रवेश टांगणीला

मुक्त विद्यापीठातील 4246 विद्यार्थ्यांचे प्रवेश टांगणीला

Subscribe

लॉकडाऊन संपताच प्रवेश निश्चित करण्याचे आदेश; अभ्यासकेंद्रात अडकले प्रवेश

नाशिक : लॉकडाऊनमुळे विद्यापीठांचे वेळापत्रक कोलमडले असताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या राज्यातील साडेचार हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश टांगणिला लागले आहेत. या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश घेतला आहे; परंतु, अभ्यासकेंद्राची मान्यताच घेतलेली नसल्यामुळे त्यांना परीक्षेस बसता येणार नसल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. लॉकडाऊन संपताच सात दिवसांच्या आत या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा अन्यथा त्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नसल्याने विद्यार्थ्यांना आता लॉकडाऊन संपण्याची प्रतिक्षा लागून आहे.

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा मे महिन्यात होतात. परंतु, लॉकडाऊनमुळे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. लॉकडाऊन संपताच परीक्षांचे नियोजन केले जाईल. मात्र, शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये प्रवेश घेतलेल्या चार हजार 246 विद्यार्थ्यांचे प्रवेशच निश्चित झालेला नाही. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अभ्यास केंद्राची मान्यता घेणे आवश्यक असते. ही प्रक्रियाच विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेली नसल्यामुळे त्यांना आता परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर सात दिवसांच्या आत जे विद्यार्थी अभ्यास केंद्रावर जाऊन प्रवेश निश्चित करतील त्यांनाच यंदा परीक्षेला बसता येणार आहे. याविषयी विद्यापीठाने सूचना दिल्या असून, या विद्यार्थ्यांची यादीच संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे. यात अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपुर, नाशिक, पुणे, कोल्हापुर, नांदेड या विभागातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
….
मुक्त विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर आहे. त्यांना अजून वेळ असल्यामुळे अभ्यास केंद्रावर जावून प्रवेश निश्चित करता येईल. जे विद्यार्थी प्रवेश निश्चित करतील त्यांना परीक्षेस बसण्यास काहीच अडचण राहणार नाही.
-प्रा. ई. वायुनंदन (कुलगुरु, मुक्त विद्यापीठ)

विभागनिहाय विद्यार्थी
अमरावती-570
औरंगाबाद-225
मुंबई-1003
नागपुर-447
नाशिक-920
पुणे-730
कोल्हापुर-101
नांदेड-250
एकूण-4246

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -