अमित ठाकरेंच्या दौर्‍यानंतर प्रतीक्षा ’मनविसे’च्या नव्या कार्यकारिणीची

नाशिक : अमित ठाकरे यांनी महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून मनसे पक्षाची युवावाहिनी मनविसेच्या पुनर्बांधणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. मुंबई कोकण भागातील अनुक्रमे पहिल्या व दुसरा टप्पा संपवून तिसर्‍या टप्प्यात अमित यांनी नाशिक जिल्ह्याचा दौरा केला. अमित यांनी आपल्या पहिल्या व दुसर्‍या टप्प्यातील दौर्‍यांनंतर मुंबई व कोकण विभागात नव्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. नाशिक जिल्ह्यातही खांदेपालट होणार की तीच फळी कायम राहणार याची उत्कंठा आता पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लागली आहे.

नाशिक मनसेचा सुरवातीच्या काळापासून बालेकिल्ला राहिला आहे. त्यातही मनसेची युवा वाहिनीचे संघटन सुरवातीपासून मजबूत राहिले आहे. वेळोवेळी पक्षाच्या मुख्यवाहिनीला मनविसेची प्रबळ साथ लाभली आहे. २०१४ च्या मोठ्या पडझडीनंतरही पक्षातील काही युवा शिलेदारांनी एकाकी किल्ला लढवत विद्यार्थी संघटना जिवंत ठेवली. परंतु एकेकाळी जिल्ह्यातील तसेच शहरातील बहुसंख्य महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी (जीएस) निवडून आणलेल्या या संघटनेला सुरवातीच्या काळापासूनच गटबाजीचे ग्रहण लागले. त्यातून शहकाटशह यातच या संघटनेची ऊर्जा खर्ची पडत राहिली आहे.

याचदरम्यान काही महिण्यापूर्वी खुद्द राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचीच मनविसेच्या अध्यक्ष पदी नेमणूक झाली. त्यानंतर अमित ठाकरे यांचा हा पहिलाच नाशिक दौरा होता. अमित यांनी महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून मनविसे पुनर्बांधणीसाठी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. त्यातील पहिल्या व दुसर्‍या टप्प्यात अनुक्रमे मुंबई व कोकण भागाचा दौरा केला. या दौर्‍यानंतर त्यांनी त्या-त्या भागातील संघटनेत मोठ्या प्रमाणात खांदेपालट केली. संघटनेत अनेक नव्या नियुक्त्या केल्या. याच पद्धतीने अमित नाशिक दौऱयानंतर नाशिकच्याही कार्यकारिणीत खांदेपालट करणार, काही नव्या चेहर्‍यांना संधी देणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे आता नाशिकच्या कार्यकारणीत कोणते नवे बदल होणार याबाबत मनसे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना उत्कंठा लागली आहे.

नामधारी पदांची सुट्टी ?

मनविसेतील गटबाजी शमवण्याच्या हेतूने, अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या हेतूने, तसेच स्थानिक नेत्यांच्या शिफारसीने मागील काळात मनविसे’त अनेक नामधारी पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. दरम्यान संघटनेच्या पदांमध्ये नीटनेटकेपणा यावा या हेतूने संघटनेतील नामधारी पदांची सुट्टी होण्याची दाट शक्यता आहे.

नाशिकला राज्य कार्यकारणी संधी मिळणार ?

अमित ठाकरे मनविसेचे अध्यक्ष झाल्यानंतर मागील महिन्यात प्रदेश कार्यकारणी जाहीर केली. या कार्यकारिणीत पक्षासाठी महत्वपुर्ण असलेल्या नाशिकला स्थान मिळेल अशी अपेक्षा नाशिक मधील कार्यकर्त्यांना होती. मात्र त्यावेळी तस घडलं नाही. परंतु, अमित ठाकरे यांच्या नाशिक दौर्‍यानंतर जेव्हा जिल्ह्यातील पदाधिकाऱयांची खांदेपालट होईल त्यावेळी नाशिकमधील चेहरा राज्यकार्यकारिणी दिसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे