दिवाळीनंतर पुन्हा पालिकेचे ढोल वाजायला सुरवात

नाशिक : महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशानुसार कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली १७ ऑक्टोबरपासून एक लाखांच्या पुढे असलेले थकबाकीदारांच्या घरासमोर किंवा आस्थापनांसमोर ढोल वाजविण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आलेली आहे. दिवाळीच्या अल्प विश्रांतीनंतर मंगळवारी (दि.१) ३५ लाख ४५ हजार ८९ रुपये रुपयांची कर वसुली झाली. नाशिक रोड विभागात सर्वाधिक १५ लाख ४९ हजारांची वसुली झाली आहे. सहा विभाग मिळून एकूण ७२ ठिकाणी ढोल वाजविण्यात आले.

मालमत्ता कर थकबाकीदारांकडून मोहिमेच्या सुरुवातीच्या तीन दिवसांतच एकूण २ कोटी ७४ लाख ३० हजार ५७१ रुपयांची वसुली मनपाने केली. एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त थकबाकी असलेले एकूण १ हजार २५८ थकबाकी भरावी तसेच चालू वर्षीचा कर भरुन नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जे कर भरणार नाहीत. त्यांच्या घरासमोर, आस्थापनांसमोर ढोल पथक ढोल वाजवणार आहे. वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण होईपर्यंत ही मोहिम सुरुच राहणार असल्याची माहिती कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांनी दिली आहे.