घरमहाराष्ट्रनाशिकमृत कोरोनाग्रस्तांच्या नातेवाईकांची मदतनिधीच्या नावाने लूट

मृत कोरोनाग्रस्तांच्या नातेवाईकांची मदतनिधीच्या नावाने लूट

Subscribe

जिल्हाधिकारी कार्यालयात कुटुुंबियांकडून उकळले जाताहेत पैसे

नाशिक:कोविड काळात अनेकांनी संधीचा फायदा घेत गोरगरिबांची लूट करण्याचा सपाटाच चालवला. विशेष करून, काही रुग्णालयांनी तर रुग्णांकडून उपचारापोटी अव्वाच्या सव्वा बिले आकारल्याच्या तक्रारी आहेत. परंतू रुग्णांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबियांची परवड थांबलेली दिसत नाही. शासनाकडून कोरोना मृतांना देण्यात येणार्‍या ५० हजार रुपयांचा मदतनिधी मिळवून देतो, असे सांगत एजंटगिरी बोकाळली आहे. अगदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बसून हे एजंट नातेवाईकांकडून पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने पैसे उकळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कोरोना काळात रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी अनेकांनी तर आपले घर, सोने-नाणे सर्वस्व पणाला लावले. उपचारासाठी आलेल्या खर्चामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या आजारामुळे कुणी आपला घरातील व्यक्ती गमावला तर कुणी नातेवाईक, मित्र गमावले. सर्वांसाठीच हा आजार नवीन असल्याने संकट हीच संधी साधत काही संधिसाधूंनी रूग्णाच्या नातेवाईकांची अक्षरशःआर्थिक लुटच केली. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्यानंतर समोर आलेल्या तक्रारीवरून हे स्पष्ट होते. परंतु कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतरही रुग्णांच्या नातेवाईकांची परवड मात्र सुरूच आहे. कोरोना मृतांच्या कुटुंबियांना केंद्र शासनाने ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. आपत्ती निधीमधून ही मदत करण्यात येणार आहे. मात्र, हा निधी अद्याप राज्य शासनाला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनालाही शासन आदेशाची प्रतिक्षा आहे. हीच संधी साधत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही एजंट अशा नागरिकांना हेरून त्यांच्याकडून मदत मिळवून देण्यासाठी एक हजार रुपये उकळत आहेत. नागरिकही या आमिषाला बळी पडत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

असा आला प्रकार उघडकीस

काही नागरीकांनी या एजंटांच्या आमिषाला बळी पडत या एजंटांकडे अर्ज सादर केले. आठ दिवस उलटूनही बँक खात्यावर पैसे जमा न झाल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अर्जुन कुरहाडे यांच्याकडे विचारणा केली. मात्र अशा प्रकारचे कोणतेही अर्ज भरून घेतले जात नसून शासनाने अद्याप मदतनिधी वाटपाची प्रक्रिया जाहीर केली नसल्याचे सांगितले. त्यानंतर नागरीकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असे अर्ज भरून घेतले जात असल्याचे सांगितल्याने याबाबतचा खुलासा झाला. त्यामुळे या एजंटांवर प्रशासनाकडून काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशा भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये. अशा व्यक्तींबद्दल माहिती नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयास द्यावी, जेणेकरून त्यांच्यावर कडक कारवाई करता येईल. या प्रकरणाची दखल घेत संबधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
                     – सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -