पार्किंग शुल्क वसुलीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे आंदोलन

आदेशाची अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

ncp andolan
पार्किंग शुल्क वसुलीविरोधात राकाँयु चे आंदोलन

नाशिक महानगरपालिकेकडून शहरातील पार्किंग बाबत धोरण आखण्यात आले असून त्यानुसार अध्यादेश काढून शहरातील मॉल मध्ये पार्किंग व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. मात्र अद्याप शहरातील मॉलमध्ये ग्राहकांकडून पार्किंगचे पैसे घेतले जात आहे. याविरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली सिटी सेंटर मॉलच्या व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिटी सेंटर मॉल येथे स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था आहे. याठिकाणी बहुमजली मॉल असल्यामुळे येथे पार्किंगला मोठ्या प्रमाणात जागा देखील उपलब्ध आहे. शहरातील पार्किंगबाबत नाशिक महानगर पालिकेच्या नवीन धोरणानुसार काढलेल्या अध्यादेशानुसार शहरातील सर्व मॉल्समधील पार्किंग व्यवस्था निशुल्क करण्याचा निर्णय घेतला असल्याने पार्किंग निशुक्ल असणे आवश्यक आहे. तरी देखील आपल्या मॉलमध्ये अजूनही महापलिकेच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसून आलेल्या ग्राहकांकडून पार्किंगचे पैसे वसूल करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

महापालिकेच्या निर्णयाचे पालन न झाल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिला आहे. यावेळी मुकेश शेवाळे, अंकुश वराडे, संतोष भुजबळ, विशाल पगार, नवराज रामराजे, संदीप चव्हाण, राज लामणकर, रोशन गव्हाणे, सुनील घुमे, चेतन देवरे, रिंकू बच्छाव, भूषण गायकवाड, स्वप्निल मोकळ, राहुल हिरे, जयपालसिंग राजपूत, प्रशांत खैरनार, यतीन पाटोळे, रोहित जाधव, राज रंधवा, सहदेव वाघमारे, धनंजय उगले, शहाबाज पठाण, सिद्धांत काळे, निलेश भंदुरे उपस्थित होते.

निवेदनातील प्रमुख मागण्या

  • महापालिकेच्या निर्णयाचे पालन करावे.
  • पार्किंग निःशुल्क करून ग्राहकांची लूट थांबवावी.
  • पार्किंग निशुल्क न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.