“ऐका ना नाशिककर”; वाहतूक शिस्तीसाठी आजपासून विशेष मोहीम

नाशिक : शहरातील वाढते अपघात, बेशिस्त वाहतूक, सातत्याने होणारे नियमांचे उल्लंघन आणि या सर्वांमध्ये अपघात बळींची वाढती संख्या पाहता नाशिककरांना वाहतुकीच्या नियमांची समज देण्यासाठी ‘ऐका ना नाशिककर’ ही मोहीम गुरुवार (दि. २१)पासून शहरात सुरू होत आहे. या मोहिमेेद्वारे वाहनचालकांचे प्रबोधन केले जाणार असल्याची माहिती नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, एम. डी. देवेंद्र बापट, संचालक सुरेश पटेल आणि गौरव धारकर यांनी दिली.

‘स्मार्ट’ वाटचाल करणार्‍या नाशिक शहरातील वाहनचालकांकडून नियमांचे मात्र ‘स्मार्ट’ उल्लंघन होताना दिसून येत आहे. वाहनचालकांनी स्वयंशिस्तीने वाहतूक नियमांचे पालन करावे आणि वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी आता नाशिक फर्स्ट संस्था आणि लॉर्ड इंडियाच्या संयुक्त विद्यमाने ‘ऐका ना नाशिककर’ ही मोहीम राबवली जाणार आहे. याद्वारे शहरात फलकांतून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाणार आहे. तसेच एक नाशिककर अन्य नाशिककरांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणार आहे. टप्याटप्यात ही मोहीम अधिक विस्तृत केली जाणार असून, जास्तीत जास्त नागरिक, संस्था यांना या मोहिमेत सहभागी करुन घेतला जाणार आहे, अशी माहिती नाशिक फर्स्टच्या वतीने देण्यात आली आहे.

दरम्यान, ‘ऐका ना नाशिककर’ या मोहिमेचे गुरुवारी (दि. 21) सकाळी लॉर्ड इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनुप देशमुख, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महापालिका आयुक्त रमेश पवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, सहायक आयुक्त सीताराम गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ही मोहीम ३१ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. यानंतर दुसर्‍या टप्प्यात तिचे विस्तारीकरण होईल.

अशी असेल मोहीम

  • शहरात सध्या ५० पेट्रोलपंपांवर वाहतूक जनजागृती बॅनर्स लावणार
  • १५०० रिक्षांवर पोस्टर्स लावणार
  • सिटीलिंक बसेसवरही पोस्टर्स
  • विविध सरकारी कार्यालयांमध्ये पोस्टर्स लावून जनजागृती
  • सामाजिक माध्यमांतूनही प्रबोधन
  • सिनेमागृहांमध्ये वेळोवेळी अवेअरनेस फिल्म दाखवणार