कारच्या डिकी, सीट, हेडलाईटच्या ठिकाणी बॉटल ठेवून मद्याची तस्करी

दोन सापळ्यात चौघांना अटक; दमणवरुन औरंगाबादला जाणारा लाखोंचा मद्यसाठा जप्त

नाताळसह नववर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्याचा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी मद्यपींना थर्टी फर्स्टचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापासत्र सुरु केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत 13 लाख 53 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली फाटा येथे शुक्रवारी (दि.१८) पहाटेच्या सुमारास दोन वाहनांना अडवून लाखो रुपयांचे मद्यसाठा जप्त केला आहे.

आंबोली फाटा येथे शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास गस्तीवर असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभाग, नाशिकच्या निरीक्षक मधुकर राख, दुय्यम निरीक्षक अरुण सूत्रावे, विलास कुवर, धनराज पवार, शाम पानसरे, सुनील पाटील अनिता भांड यांनी प्रथम स्कोडा गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करून अवैध वाहतूक रोखली. स्कोडा कार दमणवरून औरंगाबादला होती. कारमधील विक्रम साळुंखे आणि अशोक दशपूते यांची चौकशी केली असता कारमध्ये 2 लाख रुपये किमतीचे विदेशी मद्यसाठा आढळून आला. पथकाने दोघांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून कारसह 10 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

शुक्रवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास त्याच ठिकाणी संट्रो कारमधून औरंगाबादला जाणारा 1 लाख 37 हजारांचा विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. विशेष म्हणजे, संट्रो कार मध्येसुद्धा लपून छपून वाहतुक सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संट्रो कारच्या डीक्कीत, सीट खाली, हेडईटच्या ठिकाणी दारूच्या बॉटल ठेऊन हे मद्य दमनवरून औरंगाबादला जात होते. यात चंद्रदीप परमार आणि भावेश परमार या दोघाना अटक केली असून, त्यांच्याकडून कारसह 3 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.