घरताज्या घडामोडीउद्यापासून सर्व खासगी कार्यालये बंद : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

उद्यापासून सर्व खासगी कार्यालये बंद : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

Subscribe

खोटे मेसेज व्हायरल करणार्‍यांवर गुन्हे

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शासनाने जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी काही निर्बंध शिथिल केले असले तरी, शुक्रवार (दि. २२ मे) पासून रेड झोनमधील सर्व प्रकारचे खासगी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसे अध्यादेश नाशिक जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. नाशिक आणि मालेगाव महापालिका रेड झोनमध्ये असून, या झोनमध्येही ३१ मे पर्यंत सर्व प्रकारचे खासगी कार्यालये बंद ठेवण्याबाबतचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

करोनाच्या पार्श्वभुमीवर गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हयातील व्यवहार ठप्प झाले असून, लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात शासनाने उद्योगधंद्यांना काहीअंशी शिथिलता दिली. तसेच, रेड झोनमधील कन्टेन्मेंट झोन वगळता इतर भागातील दुकानेही सकाळी ९ ते ५ या वेळेत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली. शासनाने आता रेड झोन आणि नॉन रेड झोन असे दोनच झोन जाहीर केले असून नॉन रेड झोनमध्ये दैनंदिन व्यवहार सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. रेड झोनमध्ये काहीअंशी निर्बंध शिथील जरी केले असले तरी शुक्रवारपासून खाजगी कार्यालये पुन्हा एकदा पूर्णतः लॉकडाउन करण्यात येणार आहे. तशा प्रकारचे अध्यादेश राज्य शासनाने निर्गमित केले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले की, खाजगी कार्यालयांतील कर्मचार्‍यांचे वेतन काढण्यासाठी ही कार्यालये सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती मात्र शासनाकडून प्राप्त निर्देशानूसार आता ३१ मे पर्यंत सर्व प्रकारची खाजगी कार्यालये बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नाशिक जिल्हयात नाशिक आणि मालेगांव महापालिका क्षेत्र रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. उर्वरित संपुर्ण जिल्हा हा नॉन रेड झोनध्ये राहणार आहे. नॉन रेड झोनमध्ये सर्वच व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे. नॉन रेड झोनमध्ये बससेवा सुरू करण्याची परवानगी देत आहोत. कंटेनमेंट झोन वगळून मॉल, दुकाने, शॉपिंग कॉमप्लेक्समध्ये पूर्वतयारी किंवा पावसाळापूर्व तयारी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे परंतू ते व्यवसाय करू शकत नाही. कंपन्या मात्र पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. रेडझोनमध्ये मात्र रिक्षा,बससेवा सुरू करण्यात येणार नाही असेही ते म्हणाले.

- Advertisement -

… तर गुन्हे दाखल करणार

गेल्या दोन दिवसांपासून ३१ मे पर्यंत जिल्हा पुर्णतः लॉकडाउन करण्यात येणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. कोणत्याही प्रकारची वाहने बंद करण्यात येणार नाही. मात्र रिक्षा आणि बससेवा मात्र बंदच राहतील. अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणार्‍यांना कोणतीही बंदी नसेल. मात्र उगाचच काही मेसेज व्हायरल करून नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. मात्र अशा प्रकारे खोटे मेसेजेस व्हायरल करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -