पिंपळगाव बसवंत बाजार समितीत मॅनेज भरतीचा आरोप

यवतमाळच्या परीक्षार्थीसह माजी आमदारांची तक्रार; भरती रद्दची मागणी

Pimpalgaon market yard

नाशिक : जिल्ह्यातील नामांकित पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीने नुकत्याच राबवलेल्या भरती प्रक्रियेविषयी यवतमाळ येथील परिक्षार्थींसह गंभीर आक्षेप घेतल्यामुळे या भरती प्रक्रियेवर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, बाजार समितीच्या या ‘पारदर्शक’ कारभाराविषयी माजी आमदार अनिल कदम यांनीही तक्रार केली असून, भरती प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

पिंपळगाव बसवंत बाजार समितीने विविध संवर्गातील रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द केली होती. त्याआधारे शनिवारी (दि.2) पदनिहाय लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी यवतमाळ येथील परीक्षार्थी अविनाश मुरलीधर सपकाळ (सहायक संगणक चालक) हा परीक्षार्थी हजर होता. पिंपळगाव बसवंत येथील भीमाशंकर इंग्लिश मीडियम स्कूल, जोपुळ रोड येथे परीक्षा केंद्र होते. 14 तासांचा प्रवास करुन आलेल्या या परीक्षार्थिने एक दिवस येथे मुक्काम केला. त्यानंतर दुसर्‍यादिवशी सुरु होणार्‍या लेखी परीक्षेपूर्वी सर्व परीक्षार्थींकडून पोहोच पावती घ्यायला हवी होती. परंतु, एकाही परीक्षार्थीला पोहोच पावती विचारण्यात आली नाही. एका हॉलमध्ये साधारणत: 28 परीक्षार्थींची व्यवस्था करण्यात आलेली होती. परंतु, प्रत्यक्षात 18 उमेदवार परीक्षेला हजर होते. त्यांची बँग परीक्षा हॉलमध्येच ठेवण्यात आली.

विद्यार्थी एकमेकांना विचारुन प्रश्न सोडवत होते. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे निवड यादितील विकास विलास चीराटे (रोल क्र.256) याने अवघ्या 15 मिनिटांत 100 प्रश्नांची प्रश्नपत्रिका सोडवली. यानंतर त्याने वर्गाबाहेर जाण्याची परवानगी मागितली आणि त्याला ती मिळाली देखील. परीक्षा संपण्याच्या 15 मिनिटे अगोदर एक व्यक्ती परीक्षा हॉलमध्ये आला आणि चीराटे याने सोडवलेला पेपर स्वप्नील राजेंद्र लोंढे (रोल क्र. 259) या विद्यार्थ्याला दिला. हा परीक्षार्थी निफाडमधील रहिवाशी असल्याचा संशय अविनाश सपकाळ याने व्यक्त केला आहे. भरती प्रक्रियेच्या निवड यादीत स्वप्नील लोंढे यांसारख्या विद्यार्थ्यांचे नाव समाविष्ट झाले तर, माझ्यासारख्या होतकरु विद्यार्थ्यांनी काय करायचे , असा प्रश्नही त्याने उपस्थित केला. अविनाश सपकाळ याने उपस्थित केलेले प्रश्न अतिशय गंभीर स्वरुपाचे असून, याविषयी त्याने बाजार समितीला मेलद्वारे आपली तक्रार नोंदवली आहे. परीक्षार्थिने घेतलेला गंभीर आक्षेप आणि माजी आमदार कदम यांनी केलेल्या तक्रारींमुळे बाजार समितीच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हमाल, मापारी भरतीविषयी आक्षेप?

अडीच वर्षांपूर्वी याच बाजार समितीने राबवलेल्या हमाल, मापारी भरती प्रक्रियेविषयी आक्षेप घेत गोकुळ गिते यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला होता. या भरती प्रक्रियेतही आर्थिक व्यवहार झाल्याचा आक्षेप गिते यांनी घेतला होता.

भरती प्रक्रियेविषयी परीक्षार्थिंनी घेतलेल्या आक्षेपांविषयी चौकशी करत आहोत. चौकशीनंतरच याविषयी बोलणे योग्य होईल.
                                       – बी.एस.बाजरे, सचिव,कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव

बाजार समितीच्या संचालक मंडळास दोन वेळा मुदतवाढ मिळालेली असताना भरतीसारखे धोरणात्मक निर्णय घ्यायला नको! भरती प्रक्रियेत सहभागी उमेदवारांची ही शुध्द फसवणूक आहे. मूळात ही संपूर्ण प्रक्रिया ‘मॅनेज’ असल्यामुळे ही भरती रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केली आहे.
                                                                         – अनिल कदम, माजी आमदार