Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक मविप्र सभेत आरोप-प्रत्यारोपांची ‘ढगफुटी’

मविप्र सभेत आरोप-प्रत्यारोपांची ‘ढगफुटी’

संस्थेच्या सरचिटणीस पवार विरोधकांवर बरसल्या; अ‍ॅड. नितीन ठाकरेंचे आंदोलन

Related Story

- Advertisement -

मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक १० महिन्यांवर येऊन ठेपली असल्याने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेली संस्थेच्या १०७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विरोधक व सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैर्‍यांची अक्षरश: ढगफुटी झाली. सभेपूर्वी माजी सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे, विद्यमान संचालक नानासाहेब दाते यांच्यासह माजी संचालक व सभासदांनी संस्थेच्या मुख्य कार्यालयाबाहेर संचालक मंडळाच्या भ्रष्टाचार व हुकूमशाही कारभाराविरोधात आंदोलन केले. तर सत्ताधारी या नात्याने सरचिटणीस नीलिमा पवार यांनीही विरोधकांच्या सर्व प्रश्नांना सडेतोड उत्तर देत त्यांची बोलती बंद केली. फक्त आरोप करु नका, पुरावे द्या, अशा शब्दांत त्यांनी उत्तर देत फक्त संस्थेची बदनामी करत बसू नका, तर सत्कार्यात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मविप्र शिक्षण संस्थेची वार्षिक सभा बुधवारी (दि. ८) ऑनलाईन पध्दतीने पार पडली. सभा सुरु होण्यापूर्वी विरोधकांनी मुख्यालयासमोर आंदोलन केले. १५ ऑगस्ट २०१७ पासून आतापर्यंत वारसा हक्काने झालेल्या नवीन सभासदांची माहिती न देणे, सभेच्या पार्श्वभूमीवर विद्यमान संचालक व माजी संचालकांना ऑडिट रिपोर्ट न दाखविणे, कोविड काळातील मविप्र रुग्णालयासाठी लाखो रुपयांची वैद्यकीय उपकरणांची खरेदी करूनही अनेक सभासदांसह इतर रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णालयाचा ३५ टक्के झालेला डेथ रेट, रेमडेसिवरसह इतर औषधांची विक्री कोणत्या मार्गाने केली? संस्थेच्या ठेवींवरील कर्ज प्रकरणांची माहिती असे अनेक गंभीर आरोप करत अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी संस्थेतील भ्रष्टकारभारावर प्रश्न उपस्थित केले.

- Advertisement -

दरम्यान, विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तरे देत संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनीही सभेत संस्थेने कोविडच्या काळातही संस्थेने केलेल्या प्रगतीचा सविस्तर आढावाच सादर केला. कोविड असतानाही जमीन खरेदी, इमारतींचे बांधकाम, ऑनलाईन शिक्षण, मविप्र रुग्णालयातील वैद्यकीय साहित्याची खरेदी करून रुग्णांना उपचारासाठी दिलेल्या वैद्यकीय सुविधांचा झालेला लाभ अशा पद्धतीने संस्थेने केलेल्या प्रगतीचा आलेख या सभेत पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सादर केला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत चिटणीस डॉ. सुनील ढिकले, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघोनाना अहिरे, संचालक डॉ. नाना महाले, सचिन पिंगळे, भाऊसाहेब खातळे, अशोक पवार, डॉ. जयंत पवार, उत्तमबाबा भालेराव, दत्तात्रय पाटील, प्रल्हाद गडाख, डॉ. प्रशांत देवरे, रायभान काळे, हेमंत वाजे, अशोकराव पवार, डॉ. विश्राम निकम शिक्षणाधिकारी आदी उपस्थित होते.

संस्थेत लोकशाही पद्धतीने कामकाज होणे अपेक्षित असताना भ्रष्टचार व हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरु आहे. सभासदांनी काही प्रश्न उपस्थित केले, माहिती मागितली तर त्यांना कारवाई करण्याच्या नोटीसा धाडल्या जातात. त्यामुळे सभासद, माजी संचालक, कर्मचारी असे सर्वच या हुकुमशाही व दहशतीला वैतागले असल्याने आगामी निवडणूकीत बदलाची नांदी अर्थात सभासद नक्कीच परिवर्तन घडवून आणतील. – अ‍ॅड. नितीन ठाकरे, माजी सभापती, मविप्र संस्था

संस्था येत्या काळात डिजीटल एमव्हीपी, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, हॉर्टीकल्चर, आयुर्वेद, पशुवैद्यकीय या महाविद्यालयांसह मूकबधिरांसाठी महाविद्यालय, महिला महाविद्यालय सुरु करणार आहे. विरोधकांनी बिनबुडाचे आरोप न करता गैरकारभार होत असेल तर त्याचे पुरावे सादर करायला हवीत. ते नसले तर आरोपांमध्ये तथ्य नाही. संस्थेची बदनामी करू नये. कोरोना काळात शाळा व महाविद्यालये बंद असून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. तब्बल १०० कोटींची फी येणे बाकी असतानाही संस्थेने सेवक कर्मचार्‍यांचे पगार थांबवले नाही. तसेच कर्मचारी कपात केलेली नाही. – नीलिमा पवार, सरचिटणीस, मविप्र

- Advertisement -