किकवी धरणासाठी आगामी अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद करा; खा. गोडसेंची मागणी

नाशिक : शहराचा विकास दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने भविष्यात शहरवासियांना पाणीटचाईची झळ पोहचू नये यासाठी गेल्या काही वर्षांपासून खा.गोडसे यांच्याकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. खा.गोडसे यांच्या पाठपुराव्यातून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला अहवाल पाठवत येत्या २०२३-२४ च्या आर्थिक बजेटमध्ये किकवी धरणासाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणीचे पत्र पाठविले आहे. किकवी धरण नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून येत्या अल्पसंकल्पात धरणाच्या कामासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी खा.गोडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले.

सध्या नाशिक शहराला गंगापूर धरणातून पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे.गंगापूर धरणाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता सुमारे ६ टीएमसी इतकी आहे.शहराची व्याप्ती दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.यामुळे तात्कालीन सरकारने सन २०१० मध्ये किकवी धरण प्रस्तावित केले आहे . या धरणाच्या कामासाठी लागणार्‍या सर्व परवानग्या,मान्यता यापुर्वीच जलसंपदा विभागाला मिळाल्या आहेत.मात्र निधी उपलब्ध न झाल्याने या धरणाचे प्रत्यक्ष काम अद्याप पर्यंत सुरु झालेले नाही.परिणामी धरणाचा प्रश्न प्रलंबित आहे.यातूनच आज खा. गोडसे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट घेतली. काही महिन्यांपूर्वी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिपक कपूर यांच्याकडे किकवी धरण विषयी सविस्तर अहवाल पाठविलेला असून आर्थिक बजेटमध्ये किकवी धरणासाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली असल्याचे खा. गोडसे यांनी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले.