शिवजन्मोत्सवात ‘डीजे’ वाजविण्यास परवानगी, मात्र…

नाशिक : शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणार्‍या मिरवणुकीत डीजे वाजविण्यास बंदी असली तरी, मंडळांच्या ठिकाणी डीजे वाजविण्यास परवानगी देण्याच्या आग्रही मागणीस मंजुरी देत पालकमंत्री दादा भुसे यांनी नियम व अटींच्या अधिन राहून स्थानिक ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी देखावा उभारण्यात आला आहे त्या ठिकाणी डिजे वाजविण्यास परवानगी दिली आहे, मात्र याकरीता आवाजाच्या मर्यादांचे पालन करणे क्रमप्राप्त राहणार असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा रविवारी (दि.१९) रोजी साजरा होत आहे. या पार्श्वभुमीवर भुसे यांनी प्रशासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी आणि शिवजयंती मंडळाचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलमध्ये ही बैठक झाली. यावेळी मंडळांनी विविध मागण्या मांडल्या. जूने नाशिक येथून शिवरायांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार होती, मात्र मिरवणूक मार्गास परवानगी नसल्याचे कारण देत पालखी मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबत पदाधिकार्‍यांनी नाराजी दर्शवली. आपण हिंदु राष्ट्र म्हणतो परंतू याच हिंदू राष्ट्रात शिवरायांच्या जयंतीसाठी परवानगी घ्यावी लागते हे खेदजनक असल्याचे सांगत नाराजी दर्शविण्यात आली. मात्र, याबाबत पोलीस आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी वरिष्ठांकडून मार्गदर्शन मागविले असून त्यानूसार परवानगीबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.

शाहिस्तेखानाचा देखावा साकारण्यास परवानगी देण्याबाबतही या बैठकीत मागणी करण्यात आली. आपण शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकातून शिवरायांचा इतिहास शिकवतो मग तो देखाव्याच्या माध्यमातून साकारण्यास मनाई का? असा सवाल उपस्थित करण्यात आला. मात्र छत्रपती शिवरायांनी अनेक चांगले पराक्रम केले. समाजोपयोगी कार्य केले याबाबत देखावे साकारावे असे सांगत या देखाव्यास परवानगी देण्यास नकार दिला. शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली त्यानूसार रात्री १२ वाजेपर्यंत नियमांच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली. मंडळांच्या सूचना जाणून घेतल्यानंतर पालकमंत्री भुसे म्हणाले, नाशिकचा शिवजयंती उत्सव आदर्श उत्सव व्हावा. मिरवणूक मार्गावर डागडुजी करण्यात यावी. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज पुरवठा आदी उपाययोजना करण्यात याव्यात. मंडळांनी देखील प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी, महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले, पोलीस उपायुक्त प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे यांसह शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, पंचवटी शिव जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मामा राजवाडे, भगवान पाठक, कैलास देशमुख, योगेश कापसे, देवेंद्र पाटील, नवीन नाशिक उत्सव समितीचे योगेश गांगुर्डे, समीर लभडे यांसह मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंडळाच्या सूचना
  • परवानग्यांची किचकट प्रक्रिया सोपी व सुटसुटीत करा
  • आरटीओ कार्यालयाच्या आवारात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी द्या
  • ड्रोनसाठी अटी शिथील करून परवानगी द्यावी
  • एक खिडकी योजनेची अंमलबजावणी करा
  • महापालिकेने फी घेऊ नये
  • वाहतूक मार्गात बदल करावा.