बॅनर्स लावल्याप्रकरणी नगरसेवक सूर्यवंशी यांच्यासह छपाईवाल्याविरुद्ध गुन्हा

पोलीस आयुक्तांनी बॅनर, होर्डिंगसंदर्भात दिलेल्या आदेशाचे उल्लंघन

Hoarding

नाशिक – परवानगीशिवाय बॅनर अथवा होर्डिंग लावण्यास पोलीस आयुक्तांनी मनाई केली असतानाही परस्पर होर्डिंग्ज लावणाऱ्या नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांच्यासह प्रिटिंग करणाऱ्याविरुद्ध अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नगरसेवक सूर्यवंशी यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व प्रभागातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा शनिवारी (दि. २०) आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. या पार्श्वभूमीवर नगरसेवक सूर्यवंशी यांनी पाथर्डीफाटा ते शुभम पार्क या मार्गावरील डिव्हायडरवर असलेल्या पथदीपांवर ठिकठिकाणी ६० बॅनर लावले होते. त्यासाठी पोलीस आयुक्तांची परवानगी घेण्यात आलेली नाही. असे असतानाही सूर्यवंशी यांनी सटाण्यातील राहुल प्रिंटर्सचे यांच्याकडून हे बॅनर्स छापून घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी नगरसेवक सूर्यवंशी यांच्यासह संचालक राहुल आहेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.