Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक रुग्णवाहिकेचा खासगी कामासाठी वापर

रुग्णवाहिकेचा खासगी कामासाठी वापर

भुसावळचा व्हिडिओ व्हायरल; वीज कंत्राटी कामगार संघाची चौकशीची मागणी

Related Story

- Advertisement -

ज्या काळात कोरोनाबाधितांना बेड मिळत नव्हते, रुग्णांना दवाखान्यात दाखल होण्यासाठी सरकारी यंत्रणेवर मोठा ताण पडलेला होता, त्याच काळात भुसावळच्या औष्णिक केन्द्रातील रुग्णवाहिका मात्र अधिकार्‍यांच्या खासगी साहित्याची ने-आण करण्यात वापर होत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, वीजनिर्मितीकडून या घटनेचा इन्कार केला गेला.

भुसावळ औष्णिक वीजनिर्मिती केन्द्रातील अधिकारी, कामगार व कंत्राटी कामगारांना त्वरीत उपचार मिळावेत यासाठी दोन रुग्णवाहिका कार्यरत आहेत, कोरोना काळात भुसावळ औष्णिक केन्द्रातील असंख्य कंत्राटी कामगारांना लागण झाली होती, तर अनेकांना जीव गमवावा लागला. मात्र, येथे कार्यरत असलेल्या रुग्णवाहिकेचा वापर घरगुती कामासाठी होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर येथील काही संघटनांनी वीज कंपनीच्या भुसावळच्या मुख्य अभियंता प्रकाश खंदारे व मुंबई मुख्यालयात पत्र व व्हिडिओ पाठवून सखोल चौकशी करण्याची मागणीचे पत्र दिले आहे. या प्रकारामुळे कायम कामगार व कंत्राटी कामगारांत मोठी नाराजी पसरली असून कोरोना काळात गैरवापर करणार्‍यांची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

भुसावळ औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील काही अधिकारी मनमानी करत आहेत, रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी आहेत कोरोना काळात कंत्राटी कामगारांच्या उपचारासाठी रुग्णवाहिका उपलबध करुन देण्यात आली नाही. मात्र, अधिकार्‍यांच्या घरी खासगी कामासाठी वापर होणे दुर्दैवी आहे.
    – सचिन भावसार,उपाध्यक्ष, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ

 

 दैनंदिन कामासाठी रुग्णवाहिका जळगाव-भुसावळ दरम्यान जात असते. खासगी कामासाठी रुग्णवाहिकेचा वापर होत नाही. मात्र, तसे झाले असल्यास निश्चितच चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल.
      – प्रकाश खंदारे, मुख्य अभियंता, भुसावळ औष्णिक वीजनिर्मिती केंद्र

- Advertisement -