लांच्छनास्पद! डाॅक्टर नववधूची होणार कौमार्य चाचणी,अघोरी कुप्रथा थांबविण्यासाठी अंनिसचे प्रयत्न

जात पंचायतच्या पंचांकडून डाॅक्टर  असलेल्या नववधूची लग्नाच्या रात्री कौमार्य चाचणी घेण्यात येणार आहे.

andhashraddha nirmulan samiti Take action against Virginity test for bride
लांच्छनास्पद! डाॅक्टर नववधूची होणार कौमार्य चाचणी,अघोरी कुप्रथा थांबविण्यासाठी अंनिसचे प्रयत्न

देश तंत्रज्ञनाच्या सहाय्याने प्रगती करत असला तरी देशाचे सामाजिक वास्तव हे दाहक आहे. नाशिकही त्याला अपवाद नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानाने जात पंचायतीची अशी भयानक कुप्रथा समाजासमोर आणली आहे. जात पंचायतच्या पंचांकडून डाॅक्टर  असलेल्या नववधूची लग्नाच्या रात्री कौमार्य चाचणी घेण्यात येणार आहे.ती थांबविण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रयत्न करत आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने गेल्या नऊ वर्षांपासून जात पंचायत मूठमाती अभियान चालवतो. या अंतर्गत विविध समाजातील जातपंचायतींद्वारे पुरस्कृत अनेक अनिष्ट,अघोरी अन्यायकारक रूढी, प्रथा समितीने थांबवल्या आहे. समितीच्या पुढाकाराने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा सुद्धा संमत झालेला आहे.

असे असतानाही,आजही एका समाजात लग्नानंतर वधूची कौमार्य परीक्षा घेतली जाते. जातपंचांनी दिलेल्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रावर  वर व वधू यांनी झोपायचे असते.  त्यावर रक्ताचा लाल डाग पडला तरच, ते लग्न ग्राह्य धरले जाते. अन्यथा ते लग्न अमान्य करून, अशा वधूस मारहाण करून, तिच्या पालकांना  शिक्षा व  जबर आर्थिक  दंड केला जातो. दंडाची रक्कम न भरल्यास तिच्या परिवाराला वाळीत टाकले जाते.

येत्या रविवारी दि.21 नोव्हेंबर 21 रोजी सायंकाळी  नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील एका हाॅटेलमध्ये उच्च शिक्षित वधू -वराचा विवाह सोहळा होत आहे. त्यात वधूची कौमार्य परीक्षा घेण्यात  येणार असल्याचा तक्रार अर्ज अंनिसला प्राप्त झाला आहे. त्यानुसार अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. व अशी कुप्रथा थांबवण्याची विनंती करण्यात आली आहे.राज्य सरकार कडून अशा कुप्रथा थांबवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. परंतू परंपरेच्या नावाखाली स्त्रीच्या चारित्र्यावर गदा येत आहे व मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याने अंनिस उच्च न्यायालयात या कुप्रथेविरूद्ध याचिका दाखल करणार आहे. या मोहिमेत डाॅ. टी .आर .गोराणे,कृष्णा चांदगुडे,अॅड.समीर शिंदे,नितीन बागुल,महेंद्र दातरंगे कृष्णा इंद्रीकर, संजय हराळे, दिलीप काळे आदी कार्यकर्ते सामिल झाले आहे.

 


हे हि वाचा –  Priyanka Gandhi on Farm Laws : मोदींनी आरोपीच्या पित्याच्या मांडीला मांडी लावून बसू नये, प्रियंका गांधींचे पंतप्रधानांना पत्र